दोन बैल लम्पी रोगामुळे खानापूर तालुक्यात मृत्युमुखी
नंदगड : खानापूर तालुक्याच्या गावोगावात लम्पी रोगाने थैमान मांडले आहे.त्यामुळे अनेक जनावरे आजारी असून आतापर्यंत दोन बैल मृत्युमुखी पडले आहेत. दोन दिवसांपूर्वी भुरूणकी येथील शेतकऱ्यांच्या बैलाचा मृत्यू झाला होता. तर शुक्रवारी कुणकीकोप गावातील परशराम रुद्राप्पा धबाले यांच्या बैलाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे दोन्ही बैलांच्या मालकांना प्रत्येकी 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. खानापूर तालुक्यात दोन वर्षांपूर्वी लम्पी रोगामुळे अनेक जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे सावट निर्माण झाले होते. अलीकडे बहुतांशी युवकांनी व शेतकऱ्यांनी शेतीसाठी जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. देशाच्या वेगवेगळ्या भागातून गाई व म्हशी आणल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन होत आहे. यावर्षी पुन्हा लम्पी रोगाने थैमान घातल्याने शेतकरी वर्गात विशेषत:जनावरे संगोपन करणाऱ्या मालकांमधून चिंतेचे सावट निर्माण झाले आहे. यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यासाठी औषधपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.