दोघा बोट ऑपरेटरना अटक
बोटीचा परवाना रद्द, मालकाविरुद्ध गुन्हा नोंद ; कळंगुट येथे जलसफर बोट उलटल्याचे प्रकरण
प्रतिनिधी/ म्हापसा
कळंगुट समुद्रात बुधवारी जलसफरीदरम्यान झालेल्या बोट अपघातप्रकरणी बोट ऑपरेटर धारेप्पा झिराली (42 वर्षे, रा. बेळगाव) व इब्राहिमसाब (34, शिमोगा) यांना पणजी किनारी पोलिसांनी अटक केली आहे. बोटमालक मीना कुतिन्हो हिच्यावरही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अपघातग्रस्त झालेली जॉन वॉटर स्पोर्ट्सच्या बोटीचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी कळंगुट समुद्रात क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक भरुन जलसफरीवर गेलेली बोट उलटली होती. केवळ 13 प्रवासी क्षमता असलेल्या या बोटीमध्ये ऑपरेटरने 23 पर्यटकांना बसवले होते. तसेच 2 ऑपरेटर मिळून 25 जण बोटीतून समुद्रात जलसफरीसाठी निघाले होते. मात्र काही अंतर जाताच बोट वजन पेलू न शकल्याने लाटांच्या आघातात उलटली होती. यावेळी आजूबाजूच्या बोटधारकांनी तसेच जीवरक्षकांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरु केले. बुडणाऱ्या पर्यटकांना बाहेर काढून किनाऱ्यावर आणले. मात्र यात सूर्यकांत पोफळकर (45, खेड - रत्नागिरी) यांचा बुडून मृत्यू झाला. त्या कुटुंबातील दोघा मुलांसह पाच जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले होते. त्यांची प्रकृती आता सुधारत असल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, बोट मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून अटक करावी अशी लेखी मागणी आरटीआय कार्यकर्ते आत्माराम गडेकर यांनी पोलिस महासंचालक व किनारी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली आहे.