विमानांची मोपावरून पुन्हा दाबोळी विमानतळाकडे धाव
प्रतिनिधी/ पणजी
दाबोळी विमानतळावरील विमानांची संख्या पुन्हा वाढली असून गुऊवारी 26 डिसेंबर रोजी येथून 69 विमानांनी ये-जा केली. आज शुक्रवारी 71 विमाने ये-जा करतील. मोपा विमानतळ प्रकल्प कार्यान्वीत झाल्यानंतर बऱ्याच प्रमाणात दाबोळीवरील विमाने मोपाकडे वळली. त्यामुळे गेल्या 4 महिन्यात दाबोळीवर दिवसाकाठी 48 विमाने ये-जा करायची. आता तब्बल सरासरी 65 ते 70 विमानांची वाहतूक होते. काल गुरुवार 26 रोजी 69 विमानांची ये-जा झाली. त्यातून दाबोळीमध्ये 24 हजार प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला. आज 27 रोजी 71 विमाने ये-जा करतील. व त्यातून सुमारे 23 हजार प्रवासी लाभ घेतील.
मोपामुळे दाबोलीचे महत्त्व कमी होईल असा होरा अनेकांनी बांधला होता. मात्र मोपा विमानतळ हे सर्वाधिक कर आकारणारे विमानतळ ठरले आहे. त्यामुळे अनेक विमाने ही पुन्हा एकदा दाबोळीकडे वळली आहेत. दाबोळी विमानतळ पुन्हा एकदा गजबजू लागले. सध्या दाबोळीकडे प्रवाशांची पुन्हा गर्दी दिसू लागली आहे. गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे ज्यामुळे अवघ्या 100 कि. मी. च्या आत दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. दोन्ही विमानतळ व्यवस्थित चालतात. मोपाच्या तुलनेत दाबोळीचे कर कमी असल्याने विमान कंपन्यांनी आपला मोर्चा पुन्हा दाबोळीकडे वळविला आहे.