दोन बिहारी मजुरांची मणिपूरमध्ये हत्या
वृत्तसंस्था/ इंफाळ
अशांत मणिपूरमध्ये दोन परप्रांतीय मजुरांच्या हत्येची घटना उघड झाली आहे. शनिवारी संध्याकाळी काकचिंग जिह्यात दोन मजुरांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. मृत झालेले दोघेही मजूर बिहारमधील राजवाही गावचे रहिवासी आहेत. 18 वर्षीय सुनालाल कुमार आणि 17 वर्षीय दशरथ कुमार अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही आपले काम आटोपून सायकलवरून परतत असताना त्यांच्यावर बंदुकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या. कामगारांची ओळख पटली असली तरी हल्लेखोर फरार झाले असून त्यांचा शोध तपास यंत्रणांकडून घेतला जात आहे.
गेल्यावर्षी 3 मे रोजी मणिपूरमध्ये जातीय हिंसाचार सुरू झाल्यानंतर स्थलांतरित कामगारांवर झालेला हा दुसरा जीवघेणा हल्ला आहे. या वर्षी मे महिन्यात इंफाळमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी एका 41 वर्षीय परप्रांतियाची गोळ्या झाडून हत्या केली होती. तसेच अन्य दोन सहकारी कामगारांना जखमी केले होते. ते झारखंडमधील गो•ा जिल्ह्यातील रहिवासी होते.