दोन बड्या नेत्यांना बसणार धक्का..!
पुढील आठवड्यात तीन नवे मंत्री शपथबद्ध होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ पणजी
गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आल्याने सरकारला आता मंत्रिमंडळाची पुनर्रचना करावी लागणार असून, त्यानंतर या मंत्रिमंडळात तीन नवे मंत्री दिसून येण्याची शक्यता आहे. पुढच्या 29 जूनपूर्वी म्हणजे रविवारपर्यंत या तिन्ही मंत्र्यांचा शपथविधी सोहळा होण्याची चिन्हे आहेत.
आगामी पावसाळी विधानसभा अधिवेशनापूर्वी नव्या मंत्र्यांना सरकारात सामावून घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. कारण विधानसभा अधिवेशनाच्या कार्यकाळातील कामकाजासाठी ह्या तीन नव्या मंत्र्यांना वेळ मिळावा आणि विधानसभेत उत्तरे देऊ शकतील, अशापद्धतीची व्यवस्था सरकारकडून करण्यात येत आहे.
पुनर्रचना करण्यात येणाऱ्या मंत्रिमंडळात तीन नव्या चेहऱ्यांना संधी देणे हे पक्ष हिताच्यादृष्टीने विचार करण्यात येत आहे. 2027 सालच्या निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त राजकीय फायदा व्हावा तसेच अधिकाधिक उमेदवार निवडून आणण्याच्यादृष्टीने सरकारमधील दोन विद्यमान बड्या नेत्यांना वगळून त्या ठिकाणी पक्षाला बळकटी देणाऱ्या लोकप्रतिनिधींना संधी देण्याची सरकारने व्यूहरचना आखलेली आहे. केंद्रातील भाजप नेतृत्वाकडून या तीन मंत्र्याच्या निर्णयाबाबतची मान्यता आल्यानंतरच नव्या तीन मंत्र्यांच्या नावाबाबत शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळेच केंद्राच्या मान्यतेनंतर मंत्रिपदी वर्णी लागणारे नेमके तीन मंत्री कोण हे येत्या आठ ते दहा दिवसांतच कळेल, असे सूत्रांनी सांगितले.