दहा किलो गांजासह दोघे अटकेत
दोन परप्रांतीय तरुणांना अटक
10 किलो गांजा जप्त
स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
कोल्हापूर
सेंट्रीग कामाच्या नावाखाली गांजा विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले. त्यांच्याकडून १० किलो ८०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. एका बॅगेमध्ये लहान लहान पुड्यांमध्ये हा गांजा लपवून ठेवला होता. कैलाशसिंह उदयसिंह राजपूत (वय २२), किशनसिंह दौलतसिंह राजपूत (वय २१) दोघे राहणार खमनोर जि.राजसमंद राज्य राजस्थान सध्या रा. पाचगांव ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मोरेवाडी येथील एका हॉटेलजवळ दोन परप्रांतीय तरुण गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना मिळाली होती. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रविवारी सकाळी मोरेवाडी परिसरात सापळा रचला. यावेळी दोन तरुण एक बॅग घेवून तेथे आल्याचे पथकास दिसून आले. त्यांनी या दोघांना ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी प्रथम उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर त्यांची अंगझडती घेतली असता, बॅगेमध्ये लहान लहान पुड्यांमध्ये गांजा लपविल्याचे दिसून आले. पोलिसांच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेवून त्यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडील १० किलो ८०० ग्रॅम गांजा आणि दोन मोबाईल असा सुमारे २ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, विशाल खराडे, वैभव पाटील, संतोष बरगे, अशोक पोवार, परशुराम गुजरे, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, राजू येडगे, नामदेव यादव यांनी ही कारवाई केली. पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत.
फरशी, सेंट्रींगचे काम
कैलाशसिंह आणि किशनसिंह हे दोघे मुळचे राजस्थानचे आहेत. गेल्या 5 वर्षापासून ते कोल्हापूरात स्थायिक झाले आहेत. ते सुरुवातीच्या काळात फरशी बसविणे तसेच सेंट्रींगचे काम करत होते. मात्र कोल्हापूरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री होत असल्याने त्यांनी आपला मोर्चा गांजा विक्री करण्याकडे वळविला.
राजस्थान येथून आणला गांजा
या दोघांनी थेट राजस्थान येथून गांजा खरेदी करण्यास सुरुवात केली होती. या दोघांचेही मुळ गांव राजस्थान येथील असल्यामुळे त्यांना तेथील गांजा खरेदीची माहिती होती. याच जोरावर त्यांनी येथील कामागारांना आपले खरेदीदार बनवले होते.