बांधकाम कामगारांना सानुग्रह अनुदानाची प्रतीक्षा
कामगारमंत्र्यांनी दिवाळीत देण्याचे दिले होते आश्वासनः कामगारांमध्ये नाराजी
कोल्हापूर
शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याची मागणी बांधकाम कामगारांनी दिवाळीपूर्वी केली होती. पण कामगारांना दिवाळी बोनस मिळाला नाही. मात्र तत्कालीन कामगार मंत्र्यांनी सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन बांधकाम कामगारांना दिले होते. पण जानेवारी महिन्याचा मध्यावधी संपला तरी कामगारांना सानुग्रह अनुदान मिळाले नाही. यामुळे कामगारांमध्ये प्रचंड नाराजी असून अनुदानाची प्रतीक्षाही आहे.
बांधकाम कामगारांसाठी राज्यात बांधकाम कामगार कल्याण मंडळ कार्यरत आहेत. या मंडळाच्या माध्यमातून कामगारांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. बांधकाम साहित्य, संसारपयोगी संच दिले जातात. कामगारांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती दिले जाते कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतात. या योजनांचा बांधकाम कामगारांना लाभ होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन लाख बांधकाम कामगारांची नोंद असून ते लाभ घेत आहेत.
दरम्यान, शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे बांधकाम कामगारांना दिवाळीला बोनस मिळावा अशी मागणी बांधकाम कामगार संघटना काही वर्षापासून करत आहेत. यासाठी कामगार संघटनांनी कामगार आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे, आंदोलने केली आहेत. कामगार मंत्र्यांच्या निवासस्थानावरही मोर्चा काढला होता. त्यावेळी शिष्टमंडळांबरोबर झालेल्या चर्चेत बोनस ऐवजी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. पण तोपर्यंत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आणि बांधकाम कामगारांच्या सानुग्रह अनुदानाचा मुद्दा मागे पडला. यामुळे कामगारांची दिवाळी सानुग्रह अनुदानाशिवाय झाली.
निवडणूक झाल्यानंतर लवकर सानुग्रह अनुदान मिळेल अशी कामगारांना अपेक्षा होती. पण अद्याप तरी अनुदान मिळण्याच्या हालचाली दिसत नाहीत. दिवाळी जाऊन संक्रांत आली तरी अनुदान मिळण्याची चर्चाच नाही यामुळे कामगारांसह संघटनांमध्ये अस्वस्था आणि नाराजी आहे. दरम्यान, बांधकाम कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच विद्यमान कामगार मंत्र्यांची भेट घेऊन सानुग्रह अनुदान देण्यासह कामगारांच्या अन्य प्रश्नांवर चर्चा केली. या चर्चेत कामगार मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा करुन सानुग्रह अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यामुळे जानेवारी अखेर कामगारांना सानुग्रह अनुदान मिळेल अशी अपेक्षा पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
सानुग्रह अनुदान विचाराधीन होते.
बांधकाम कामगारांनी दिवाळी बोनस देण्याची मागणी केली होती. यासाठी दिवाळीत बांधकाम कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चाही झाल्या. त्यावेळी कामगारांना सानुग्रह अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन होता. मात्र अद्याप तरी त्याबाबत निर्णय झालेला नाही.
विशाल घोडके, सहायक कामगार आयुक्त
अनुदान मिळाले नाही तर मुंबईत आंदोलन
बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस देण्याची मागणी शासनाकडे केली होती. त्यावेळी कामगार मंत्र्यांनी सानुग्रह अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते. पण अद्याप तरी अनुदान मिळाले नाही. गेल्या आठवडयात विद्यमान कामगार मंत्री यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी लवकर हे अनुदान देऊ असे सांगितले आहे. अनुदान मिळाले नाही तर बांधकाम कामगार मुंबईत आंदोलन करतील.
संजय गुदगे, अध्यक्ष वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल युनियन