गांजा घेऊन निघालेल्या दोघांना वारूंजीत अटक! दहा किलो गांजा, दुचाकी जप्त
कराड प्रतिनिधी
पाटणकडे गांजा विक्रीसाठी निघालेल्या दोघांना कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. वारुंजी (विमानतळ, ता. कराड) गावच्या हद्दीत गुरूवारी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे साडेदहा किलो गांजा व एक दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राहुल मोरे (रा. कालेटेक, ता. कराड), निखील थोरात (रा. नांदलापूर, ता. कराड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी शहर व परिसरात गांजा विक्री व वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना डीवायएसपी अमोल ठाकूर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोंडीराम पाटील, शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुरूवारी दुपारी कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेतील आनंदा जाधव, मोहसीन मोमीन, हर्षल सुखदेव यांना माहिती मिळाली की, दोघेजण दुचाकीवरून पाटणच्या बाजूला गांजा विक्रीकरीता निघाले आहेत.
पोलिसांनी वारुंजी (विमानतळ) हद्दीत सापळा रचून पाटणकडे निघालेली राहुल मोरे व निखील थोरात यांची दुचाकी थांबवली. त्यावेळी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता गाडीमध्ये सुमारे साडेदहा किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी दुचाकीसह गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.