घरफोडीप्रकरणी दोघांना अटक
कोल्हापूर :
शहरातील ताराबाई पार्कमधील टेलिफोन भवनमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या चोरीच्या गुह्याचा 24 तासाच्या आत पोलिसांनी छडा लावून, दोघा चोरट्याना अटक केली. रोहित संजय देशपांडे (वय 34, रा. कोडणी, ता. चिक्कोडी, जि. बेळगाव), प्रणव संभाजी पोवार (वय 28, रा. कोगील खुर्द, ता. करवीर, जि. कोल्हापूर) अशी त्याची नावे आहेत. या दोघाकडून टेलिफोन भवनमधूनमधून चोरी केलेली 3 लाख 60 हजार रुपये किंमतीची 15 आयडल केबल वायर जप्त केली. तसेच ही केबल वायर विकत घेणाऱ्या जमीर अकबर पटवेगार (रा. सदर बाजार, कोल्हापूर) याला ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
ताराबाई पार्क येथील भारत संचार निगम लिमिटेड या कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयामधील 3 लाख 60 हजार रुपये किंमतीची 15 आयडल केबल वायर चोरीस गेली होती. चोरीची ही घटना 9 जानेवारी रोजी उघडकीस आली होती. याविषयी या कंपनीच्या महिला अधिकारी मीना कागीनकर यांनी शाहुपूरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.