चोरटी लाकूड वाहतूक करणारे दोघे ताब्यात
शिरसी येथे कारवाई : 92 नाटांसह बाराचाकी लॉरी जप्त
कारवार : जिल्ह्यातील शिरसी येथील चंदन वुडवर्क्स व फर्निचरजवळ वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करून चोरटी वाहतूक करण्यात येत असलेल्या 92 नाटांसह बाराचाकी लॉरी जप्त केली. याप्रकरणी लॉरी चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची नावे महादेव रामचंद्र वड्ड (वय 34, रा. कोल्हापूर), जगदीश महादेव गुडीगार (वय 46, रा. कोप्पळ कॉलनी, शिरसी) अशी आहेत. ताब्यात घेतलेल्यांपैकी वड्ड हा लॉरीचालक आहे. केए 23 ए 4226 क्रमांकाच्या लॉरीमधून अकेशिया लाकडाच्या नाटांची बेकायदेशीर वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिरसी वनसंचारी दलाचे उपसंरक्षणाधिकारी अशोक व्ही. एच., शिरसी विभागीय वनाधिकारी गिरीश एल. नाईक आणि वनसंचारी दलाच्या विभागीय अधिकारी शिल्पा नाईक यांनी धाड टाकून लॉरी ताब्यात घेतली. उपवनसंरक्षणाधिकारी डॉ. अज्जय्या जी. आर. व साहाय्यक वनसंरक्षणाधिकारी एस. एस. निंगाणी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत वनाधिकारी धनंजय नाईक, राजेश कोटारकर, शशिधर एल. जी. आणि यशस्वीनी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.