अरबी समुद्रात वाऱ्यामुळे मच्छीमारी होडी उलटली
होडीसह मासळीची लाखो रुपयांची हानी
कारवार : जिल्ह्यातील गोकर्णपासून 35 नॉटिकल माईल्स अंतरावरील अरबी समुद्रात वाऱ्यामुळे मच्छीमारी होडी पलटी झाल्याची घटना गुरुवारी घडली. या दुर्घटनेमुळे होडी आणि मासळीची लाखो रुपयांची हानी झाली आहे. तथापि मंगळूर येथील अन्य एका मच्छीमारी होडीने घटनास्थळी धाव घेऊन चार मच्छीमारी बांधवांना सुखरुपपणे वाचविले. वाचविण्यात आलेल्या मच्छीमारी बांधवांची नावे संदीप सुरेश तांडेल, राजू गणपती कांबळे, प्रशांत पी. मेहता आणि सृजन एम. कवणेकर अशी आहेत. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, गोकर्ण नजीकच्या गंगेकोळ्ळ येथून चार मच्छीमारी बांधव मासेमारीसाठी अरबी समुद्रात उतरले होते. समुद्र किनाऱ्यांपासून 35 नॉटिकल माईल्स अंतरावरील समुद्रात मासेमारी करीत असताना जोरदार वाऱ्यामुळे होडी उलटून चारही मच्छीमारी बांधव अडचणीत आले. ही बाब लक्षात येताच घटनास्थळापासून काही अंतरावर पर्शियन होडीद्वारे मासेमारी करणारे मंगळूर येथील मच्छीमार घटनास्थळी दाखल झाले व अडचणीत सापडलेल्या मच्छीमारी बांधवांना सुखरुपपणे वाचविले. त्यानंतर श्रीलीला नावाच्या होडीतून त्या मच्छीमारी बांधवांना समुद्र किनाऱ्यापर्यंत आणले. तथापि होडीची व होडीतील मासळीची हानी झाल्याचे सांगण्यात आले.