गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणारे दोघेजण ताब्यात
प्रतिनिधी/ कारवार
पायांना आणि शरीराच्या इतर भागांवर बांधून गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांची वाहतूक करणाऱ्या दोघांना अबकारी खात्याच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांची नावे प्रवीण पांडुरंग गोकर्ण (रा. हायचर्च, कारवार) आणि राजन पिळै (रा. सोनारवाडा, कारवार) अशी आहेत. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडून 52 हजार 400 रुपये किमतीची 65.25 लिटर गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, 31 डिसेंबर जवळ येत असल्याने गोवा बनावटीच्या दारूची चोरटी वाहतूक मोठ्या प्रमाणात होणार याचा अंदाज असल्याने अबकारी खाते अलर्ट मोडवर आहे.मंगळूर येथील अबकारी खात्याच्या जॉईंट कमिशनरांच्या आदेशान्वये कारवार अबकारी खात्याचे जिल्हा पथक ठिकठिकाणी गस्त घालीत आहे.
या पथकाने येथील बसस्थानकावर गोव्याहून दाखल झालेल्या वाहनाची तपासणी केली असता, बसमधील दोन प्रवासी विचित्ररीत्या वागत असल्याचे दिसून आले. गस्त पथकाचा संशय बळावल्याने त्या दोन प्रवाशांची कसून तपासणी केली असता त्यांनी आपल्या पायांना आणि शरीराच्या इतर भागांवर गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्या बांधून घेतल्याचे आढळून आले. त्यानंतर त्या दोन प्रवाशांना ताब्यात घेऊन दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत अबकारी खात्याचे निरीक्षक विजय महंतेश लमाणी, उपनिरीक्षक नागराज कोट्टगी, कर्मचारी कृष्णा नाईक आणि वाहनचालक रविंद्र नाईक हे सहभागी झाले होते.