अस्वलांच्या हल्ल्यात ग्रा. पं. सदस्य जखमी
यल्लापूर तालुक्यातील घटना : बंदोबस्त करण्याची वनखात्याकडे मागणी
कारवार : मोटारसायकलवरुन निघालेल्या ग्रामपंचायत सदस्यावर अस्वलांनी हल्ला चढविल्याची घटना शनिवारी सकाळी यल्लापूर तालुक्यातील हुतकंड येथे घडली आहे. अस्वलांच्या हल्ल्यात गंभीररीत्या जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आर. एस. भट असे आहे. ते यल्लापूर तालुक्यातील चंद्रोळी ग्रामपंचायतीचे सदस्य आणि पी. एल. डी. बँकेचे अध्यक्ष आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, भट हे शनिवारी सकाळी 7 वाजता मोटारसायकलवरुन निघाले असता वाटेत त्यांना अस्वलांनी गाठले. वेगाने मोटारसायकल चालवून भट यांनी तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला.
तथापि अस्वलांनी भट यांचे हात, पाय आणि चेहऱ्यावर ओरबडून मोटारसायकलवरुन खाली पाडले. रक्तबंबाळ अवस्थेत भट यांनी घर गाठले. कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी यल्लापूर येथील तालुका रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हुबळी येथे किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच यल्लापूर-मुंदगोडचे आमदार शिवराम हेब्बार यांनी यल्लापूर तालुका रुग्णालयाला भेट देऊन भट यांच्या प्रकृतीची चौकशी केली. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून यल्लापूर तालुक्यातील चंद्रोळी, उपळेश्वर, हुतकंड आदी भागात अस्वलांचा वावर वाढल्याची तक्रार स्थानिकांनी वन खात्याकडे केली आहे. या अस्वलांचा बंदोबस्त करण्याची मागणीही वन खात्याकडे करण्यात आली आहे.