Kolhapur Crime : कोल्हापुरात विदेशी दारूची चोरटी वाहतूक; दोघांना अटक
मरळी येथे एलसीबीची मोठी कारवाई; ५.७४ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : विदेशी दारूची बेकायदेशीर चोरटी वाहतूक करणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५ लाख ७४ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मरळी (ता. पन्हाळा) येथे ही कारवाई करण्यात आली.संकेत शिवाजी आमकर (वय ४१, धंदा चालक) व वामन श्रीधर लाड (वय ५०, धंदा चहा गाडी, दोघेही रा. अनुस्कुरा, ता. शाहूवाडी, अशी अटक करण्यात आलेल्यांची आहेत.
पोलीस अंमलदार अनिकेत मोरे यांना मिळालेल्या माहितीनुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मरळी येथील ओढ्याच्या पुलाजवळ सापळा रचला. तपासणीदरम्यान चारचाकी वाहन अडवून झडती घेतली असता त्यामध्ये विदेशी दारूचे बॉक्स आढळून आले.चौकशीत आरोपी वामन लाड याने बेकायदेशीररित्या विदेशी दारू विक्रीसाठी वाहतूक करत असल्याची कबुली दिली. आरोपींकडे दारू विक्री अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत ७४ हजार रुपयांची विदेशी दारू व वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली कार असा एकूण ५ लाख ७४ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया करून जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी कळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, तसेच पोलीस अंमलदार अनिकेत मोरे, सचिन जाधव, वसंत पिंगळे, अरविंद पाटील व सतीश सूर्यवंशी यांनी अधिक तपास केला.