बागायत कचरा प्रकल्पासाठी करणार दोन एकर जागा खरेदी
मनपा आरोग्य स्थायी समिती बैठकीत निर्णय : गांडूळ खताची होणार निर्मिती
बेळगाव : बागायत कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी दोन एकर जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला बुधवारच्या आरोग्य स्थायी समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली. जागा उपलब्ध झाल्यानंतर चंदिगडच्या धर्तीवर बागायत कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळ खत तयार केले जाणार आहे. खताची विक्री करून महानगरपालिकेला आर्थिक उत्पन्न मिळवून दिले जाणार आहे. काही दिवसापूर्वी बेळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक चंदिगड अभ्यास दौऱ्यावर गेले होते. त्याठिकाणी चंदिगड महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात आलेल्या अनेक वेगवेगळ्या प्रकल्पांची पाहणी करण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून सध्या तुरमुरी येथील महापालिकेच्या घनकचरा प्रकल्प आवारात पिंक पोल्ट्री सुरु करण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत.
पोल्ट्री उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात असून त्याठिकाणी गावराण कोंबड्या पाळल्या जाणार आहेत. मिळणारी अंडी सफाई कामगारांना दिली जाणार आहेत. त्याचबरोबर चंदिगडप्रमाणेच बेळगावात देखील बागायत कचऱ्यापासून गांढूळ खत तयार करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी दोन एकर जागेची आवश्यकता असून जागा उपलब्ध करून देण्यात यावी, असा प्रस्ताव आरोग्य विभागाच्यावतीने बुधवारच्या स्थायी समिती बैठकीत ठेवण्यात आला. त्याला चर्चा करून जागेसाठी मंजुरी देण्यात आली. याठिकाणी तयार होणाऱ्या गांडूळ खताची विक्री केली जाणार असून त्यामाध्यमातून महानगरपालिकेला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे.
आणखी एका पेट्रोल पंपाची मागणी
शहरातील कचऱ्याची उचल आणि वाहतूक करण्यासाठी सध्या 172 वाहने कार्यरत आहेत. सकाळच्या वेळी इंधन भरण्यासाठी सध्याच्या पेट्रोल पंपावर वाहने गेली असता बऱ्याचवेळा इंधन मिळत नाही. त्यामुळे कचऱ्याची उचल करण्यासाठी नियोजित ठिकाणी वाहनांना पोहोचण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अन्य एका पेट्रोल पंपाची निवड केल्यास सोयीस्कर होईल असे पर्यावरण अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावेळी दक्षिण भागातील एखादा पंप निवडावा अशी सूचना बैठकीत करण्यात आली.
एबीसी केंद्रासाठी के. के. कोप्प येथे जागेची पाहणी
शहर आणि उत्तर नगरातील भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांना सध्या श्रीनगर येथील एबीसी (अॅनिमल बर्थ कंट्रोल) विभागात हलविले जात आहे. मात्र सध्याची केंद्राची जागा अपुरी पडत आहे. तसेच रहिवाशांतून देखील तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे एबीसी केंद्रासाठी पर्यायी जागेची पाहणी करण्याची सूचना यापूर्वीच आरोग्य अधिकाऱ्यांना करण्यात आली होती. आजच्या बैठकीत पुन्हा हा विषय चर्चेस आला. त्यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. संजीव नांद्रे आणि पर्यावरण अभियंता हनुमंत कलादगी यांनी एबीसी केंद्रासाठी के. के. कोप्प जागेची पाहणी केल्याचे बैठकीत सांगितले.