For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुळी गोष्ट...

06:27 AM Sep 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
जुळी गोष्ट
Advertisement

आटपाट नगर होतं. नगरात राजाराणी आणि प्रजा आनंदात राहत होते. खूप वर्षांनी राणीला मूल होणार अशी वार्ता समजली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. हा आनंद द्विगुणीत करायला आणखीन एक गोष्ट कळली, ती म्हणजे राणीला जुळी बाळं होणार होती. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. आपल्या राजाला त्याच्या गादीला वारस मिळणार म्हणून आनंद झाला. यथावकाश राणीला एक मुलगा आणि एक मुलगी अशी बाळं झाली. दोन्हीही देखणी गुटगुटीत आणि सुंदर. लहानपणी सांभाळतांना खूप मजा येत असे. कारण दोघेही अतिशय शांत काहीही गडबड न करणारे फार हालचाल न करणारे, बघायची हळूहळू, रडायचे मुळूमुळू, म्हणून सगळ्यांना गंमत वाटायची. मुलाचं नाव चंद्रसेन आणि मुलीचे नाव इंद्रावती. एवढी अवघड नावं म्हणण्यापेक्षा लोकांनी मुलाला चेंगटराव आणि मुलीला हळू बाई असे टोपण नाव मात्र ठेवले. दोघांना सांभाळायला दोन नोकर ठेवले. परंतु या नोकरांच्या अगदी नाकात दम यायचा. मुलीला भरवायला घेतलं की एक घास 32 वेळा चावून खायची, सगळे नोकर रडकुंडिला यायला लागले. हळुबाई आवाज न करता मुसमुसत रडायची. शेवटी राणी तिला चिडून म्हणायची अगं रड तरी जोरात ढसाढसा. कसं होणार ह्या मुलांचं कोणास ठाऊक? जे या हळुबाईचं तेच त्या चेंगटरावाचं सुद्धा. मुलाकडे राजा जास्तच लक्ष द्यायचा व वंशाचा दिवा म्हणून सतत त्याला कडेवर घेऊन मिरवायला दोन दोन माणसं ठेवली होती. त्यालाही ते खूप आवडायचं. कुठल्यातरी पालखीत बसून आपण फिरतोय अशा आनंदात तो प्रत्येकाच्या कडेवर फिरत राहायचा. कुठची गोष्ट हवी असेल तर फक्त बोट दाखवायचा. पण तोंडातून शब्द काही बाहेर यायचा नाही. खाण्याचे तेच, बोलण्याचे तेच, चालण्याचेही तेच, हा जेव्हा पालथा पडायला लागला तेंव्हा सुद्धा स्वत: कष्टाने पालथा पडायचंच नाही. त्याला कुणाची तरी मदत लागायची. त्याला कोणीतरी मागनं ढकलला की मग पोटावरती सिसॉ केल्यासारखा पडून राहायचा. चालताना देखील नोकरांच्या पायावर पाय ठेवून त्याच्याच मदतीने चालायला त्याला आवडायचे पण स्वत:चे मात्र पाय काही हलवायचे नाहीत. राजा राणीला ही मुलं केव्हा बोलायला लागतील, केव्हा नीट वागायला लागतील, याची मात्र सतत काळजी वाटायला लागली. वेगवेगळे डॉक्टर, वैद्य बोलवले. वेगवेगळ्या प्रकारचे काढे दिले. जिभेवरती शेंगासुद्धा घासून पाहिल्या पण काही केल्या ही पोरं बोलेना. एक दिवस रात्रीच्या जेवणाच्या वेळी राणीसाहेब स्वत: हळू बाईला भरवत होत्या. काही केल्या ती घास चावत नव्हती आणि गिळतही नव्हती. एवढ्यात भिंतीवरून एक पाल पुढे सरसावली आणि लांब असलेल्या झुरळाला खायला गेली. त्या दोघांचीही हालचाल बघून चिंगी जवळजवळ किंचाळलीच, आईच्या गळ्याला घट्ट मिठी मारत भरभर खाऊ लागली, आवरू लागली. राणी साहेबांनी मनातल्या मनात पाली आणि झुरळाचे आभार मानले. त्याचवेळी बाहेर बागेत राजेसाहेब आपल्या लाडक्या राजपुत्राला घेऊन फिरत होते. झाडांची नावं सागत होते, पण हा ढिम्मच, गवतावर लोळत पडलेला. इतक्यात राजवाड्याच्या सुरक्षेसाठी आणलेली कुत्री दाखवायला एक सेवक पुढे आला. जर्मन शेफर्ड जातीच्या एका कुत्र्याला हा लोळणारा प्राणी आवडला नसावा. तो जो धावून आला आणि ओरडला की चेंगटरावांना पळता भुई थोडी झाली आणि ओरडताना अनेक शब्द न शिकवता गळ्यातून बाहेर पडले. राजे साहेबांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या. राणी साहेबांनी हळूबाईत झालेला बदल सांगितला. सगळीकडे आनंदी आनंद झाला.....देव कोणत्या रूपात मदतीला धावून येतो हे कळत नाही...राजांनी कुत्र्याला बक्षीस म्हणून उत्तम खुराक दिला, नोकराला गळ्यातला कंठा दिला ....आता सारा राजवाडा छोट्यांच्या बोबड्या बोलाने गजबजून गेला

Advertisement

Advertisement
Tags :

.