शेती पाणी उपसा दरात हेक्टरी तब्बल बारा पट वाढ; शेतीच्या पाणी दरात हेक्टरी 12 पटींनी वाढ
कृष्णा खोरे महामंडळाच्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नोटिसा : कोणत्या निकषावर दरवाढ केली?
आमदार पी. एन. पाटील यांनी विधानसभेत सरकारला धरले धारेवर; दरवाढ तातडीने मागे घेण्याची मागणी
नागपूर, कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर जिह्यातील सर्व नद्यांमधून शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना कृष्णा खोरे विकास महामंडळाने नोटीस पाठवून हेक्टरी बारा पट दरवाढ केल्याचे सुचित केले आहे. तर शेतीसाठी पाणी उपसा करताना मीटर बसवणे अनिवार्य असल्याचे सांगून मीटर नसेल तर अजून दुप्पट दरवाढ केली जाईल असे म्हटले आहे. ही अन्यायी दरवाढ मागे घ्यावी, अशी जोरदार मागणी करत काँग्रेस नेते आमदार पी. एन. पाटील यांनी बुधवारी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील कामकाजात राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. आधीच अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर कोणत्या निकषांच्या आधारे दरवाढ लादण्यात आली?, त्याचा खुलासा सरकारने करावा, असेही आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले.
विधानसभेतील कामकाजात आमदार पी. एन. पाटील यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही नदीतून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी आताच्या दरापेक्षा तब्बल बारा पट दरवाढ करून चांगलेच अडचणीत आणले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र संताप असून त्यांच्या भावना तीव्र आहे, असे सांगितले.
ते म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाने काही दिवसांपूर्वी एक जाहिरात प्रसिध्द केली आहे. कोल्हापूर जिह्यातील सर्व नद्यांतून शेतीसाठी वापर होणाऱ्या पाण्याचा दर सरासरी बारा पटीने वाढवला आहे. यापूर्वी हा दर हेक्टरी 1122 रुपये होता. अचानक हेक्टरी 13 हजार 22 रुपये केला. म्हणजे बारपटीने दरवाढ केली आहे. कोल्हापूर जिह्यातील सर्व धरणे ही सरासरी चाळीस वर्षांपूर्वी बांधलेली आहेत. राधानगरी धरण तर राजर्षी शाहू महाराज यांनी बांधले आहे. काही कारण नसताना नदीतून पाणी उपसाचा दर इतका प्रचंड वाढवण्याचे कारण काय ? या जाहिरातीनंतर महामंडळाने सर्व पाणीपुरवठा संस्थांना नोटीस पाठवली आहे. शेतीसाठी पाणी उपसा करताना मीटर बसवून घेण्याची सुचना केली आहे. शेतीसाठी मीटर बसवून पाणी घ्यायचे आणि मीटर नाही बसवले तर तेरा हजारांच्या दुप्पट दर आकारणी केली जाईल, असे म्हटले आहे.
गोरगरीबांसह शेतकऱ्यांना न्याय देऊ असे सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत असतात. आता ही अन्यायी दरवाढ सरकारने मागे घ्यावी. सरकार यावर काय करणार याचे स्पष्टीकरण द्यावे. एकाएकी असे बारापटीने दरवाढीचा निर्णय का घ्यावा लागला. त्यासाठी कोणते निकष लावले याचा खुलासा सरकारने करावा, ही दरवाढ करु नये.
- आमदार पी.एन. पाटील