टीव्हीएसचा तिमाही नफा 45 टक्क्यांनी मजबूत
महसुलात 14 टक्क्यांची वाढ : जुलै-सप्टैबरमध्ये 12.30 लाख वाहन विक्री
वृत्तसंस्था/मुंबई
ऑटोमोबाईल कंपनी टीव्हीएस मोटर्सने आर्थिक वर्ष 2024-25 च्या दुसऱ्या तिमाहीत 560.49 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा नोंदवला आहे. तो वार्षिक आधारावर 45.07 टक्क्यांनी वाढला आहे. वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला 386.34 कोटी रुपयांचा नफा झाला होता. जुलै-सप्टेंबर तिमाहीत टीव्हीएस मोटर्सचा एकत्रित महसूल वार्षिक तुलनेत 13.78 टक्क्यांनी वधारुन तो 11,301.68 कोटी रुपये झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 9,932.82 कोटी रुपये होता.
एकूण उत्पन्न 14 टक्क्यांनी वाढून 11,334 कोटी
दुसऱ्या तिमाहीत एकूण उत्पन्नाबद्दल बोलायचे झाल्यास, टीव्हीएस मोटर्सने 11333.99 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ती वार्षिक आधारावर 13.52 टक्क्यांनी वाढली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 च्या याच तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 9,983.75 कोटी रुपये होता.
12 लाख वाहने विकली
टीव्हीएसने दुसऱ्या तिमाहीत 12.30 लाख वाहनांची विक्री केली असल्याची नोंद झाली आहे. टीव्हीएसने चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत एकूण 12.30 लाख वाहनांची विक्री केली आहे. कंपनीच्या विक्रीत वार्षिक 14 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय, इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वार्षिक 31 टक्क्यांनी वाढून 75,000 युनिट्सवर पोहोचली आहे.
समभागाची कामगिरी
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये टीव्हीएस मोटर्सची एकूण विक्री 41.91 लाख वाहने होती. या वर्षी टीव्हीएसच्या शेअरमध्ये 45 टक्क्यांनी वाढ झाली आहे. निकालानंतर 23 ऑक्टोबर टीव्हीएसचा शेअर 3.18 टक्क्यांनी घसरून 2,577 रुपयांवर बंद झाला. कंपनीच्या समभागांनी गेल्या 5 दिवसात 3.87 टक्के आणि एका महिन्यात 9.39 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे.