For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कालमणी भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ

11:01 AM Jul 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
कालमणी भागात टस्कर हत्तीचा धुमाकूळ
Advertisement

ऊस-भात पिकाची नासधूस : वनखात्याने हत्तीला हुसकावून लावणे गरजेचे 

Advertisement

वार्ताहर /कणकुंबी

कालमणी आणि हब्बनहट्टी दरम्यान असलेल्या शेतवडीत गेल्या दोन दिवसांपासून टस्कर हत्तीने धुमाकूळ घालून ऊस पिकांबरोबरच भाताच्या तरव्यांचीही नासधूस केली आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून टस्कर हत्तीने कालमणी आणि हब्बनहट्टी गावातील शेतकऱ्यांचा ऊस, भात व भाताचे तरवे पिकांची नासधूस केली आहे. जांबोटी परिसरात बऱ्याच दिवसांनी टस्कर हत्तीचे आगमन झाले असून कालमणी येथील रमेश सुतार यांच्या शेतातील उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतातील भाताचे तरवे व लागवड केलेली रोपेसुद्धा नासधूस केली आहेत. सध्या भातरोप लावणी व इतर कामासंदर्भात शेतकऱ्यांना एकटे-दुकटे शेताकडे जावे लागते. अशा परिस्थितीत जांबोटी भागात हत्तीचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून वनखात्याने हत्तीला हुसकावून लावणे गरजेचे आहे.

Advertisement

हत्तीचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी

जांबोटी वन खात्याने सदर टस्कर हत्तीचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. टस्कराने चालवलेल्या धुमाकूळसंदर्भात रमेश सुतार यांनी जांबोटी वनाधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. सदर शेतकऱ्याच्या पिकाचा पंचनामा करून योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.