Sangli : आटपाडीत शेळ्या-मेंढ्यांच्या यात्रेत 4 कोटींची उलाढाल
आटपाडीत बाजार समिती आवारात यात्रा
आटपाडी : आटपाडी बाजार समितीच्या आवारात श्री. उत्तरेश्वर देवाच्या शेळ्या-मेंढ्यांची यात्रा उत्साहात पार पडली. दोन दिवसात विक्रमी ४ कोटी रूपयांची उलाढाल यात्रेत झाली. १२ हजारपेक्षा अधिक शेळ्या-मेंढ्यांची आटपाडी यात्रेत आवक झाली. लाखोंच्या किंमतींची बोली लागत मेंढ्या, बकऱ्यांची खरेदी करत मेंढपाळ बांधवांनी गुलालासह आनंदोत्सव साजरा केला.
आटपाडी बाजार समितीच्या आवारात उत्तरेश्वर देवाच्या कार्तिक यात्रेनिमित्त शेळ्या-मेंढ्यांची यात्रा दोन दिवस रंगली. महाराष्ट्र, कर्नाटकातील मेंढपाळ बांधव, पशुपालक, व्यापाऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे. यात्रेत बुधवारी मोठ्या प्रमाणात जनावरांच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले.
विविध भागातून आटपाडीत दाखल झालेल्या शेळ्या, मेंढ्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढत जल्लोषी नाच करत शेतकरी, पशुपालक, मेंढपाळ बांधवांनी यात्रेचा आनंद घेतला. माडग्याळी जातीच्या मेंढ्या, बकरे यांना मोठी मागणी असल्याने साडेतीन लाखापर्यंत एका-एका जनावरांची किंमत गेली. त्यापेक्षाही अधिकच्या दराने जनावरांची खरेदी-विक्री झाली. सुमारे चार कोटींची उलाढाल दोन दिवसाच्या कालावधीत झाली. जनावरे खरेदी करणारे आणि विक्री करणाऱ्या जनावरांनीही गुलालांची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.
बाजार समितीतर्फे आदत बकरा एक वर्षावरील, दुसा आणि चौसा बकरा, सहादाती जुळुक बकरा, २१ मेंढ्यांचा कळप आणि ५ वर्षावरील बकऱ्याची निवड करून त्याला 'हिंदकेसरी' किताबासह बुलेट गाडी बक्षीस रूपात दिले जाणार आहे. आचारसंहितेमुळे बाजार समितीने निकाल जाहीर केला नाही. यात्रा यशस्वी करण्यासाठी बाजार समितीचे सभापती, उपसभापती, संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कष्ट घेतले.