महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडे वळताना

06:26 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दिवाळी भारतभर उत्साहात साजरी होते मात्र गोव्याची दिवाळीच न्यारी, असे म्हणावे लागेल. इथे नरकासुररुपी दृष्ट प्रवृत्तींचेही दहन होते. यंदाही नरकासुर वध झकास झाला. वधाचा आनंदोत्सव थांबणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. एवढेच नव्हे राज्याचे सरकारही या आनंदोत्सवात सहभागी झाले. याला सरकारचे समर्थनच म्हणावे लागेल. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या मूडमधून दिवाळीच्या मूडमध्ये शिरलेला गोवा आता ‘इफ्फी’च्या मूडकडे वळू लागला आहे. येणारे पंधरा दिवस गोवा ‘इफ्फी’मय झालेला असेल. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे गोवा हे कायम केंद्र व्हावे, यामागील उद्दिष्ट सफल झाले आहे का, हे तपासण्याची ही वेळ आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने गोव्याच्या क्रीडा क्षेत्राला नवे वळण मिळेल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.

Advertisement

‘नेमेची येतो मग पावसाळा’प्रमाणे दिवाळीही आली आणि आनंद देऊन गेली. महागाईची चिंता होतीच. तिला क्षणभर विसरण्यासाठी दिवाळी कामी आली. महागाईची चिंता देशभर आहे. गोव्यात ती काकणभर जास्तच आहे. कारण गोवा हे पर्यटन क्षेत्र आहे. मद्य स्वस्त आणि जगणे महाग आहे. त्यातच कष्टकरी जीवनाला थोडासा दिलासा देतात ते सण आणि उत्सव. त्यात दिवाळीच नव्हे, राक्षसी प्रवृत्तीचे दहनही आलेच. पुढच्या महिन्यात नाताळ येईल. त्यानंतर इंग्रजी नववर्षाचे स्वागत होईल. या स्वागताच्या नावाने गोवाभर जे काही घडते, त्याविरुद्ध ढवळीकरांनी कधीतरी बोलायला हवे.

Advertisement

छोट्याशा शांत गोव्यात शासकीय समारोह होतच असतात. त्याला ‘इव्हेंट’ असे म्हटले जाते. जणू दर महिन्याला दिवाळीच होते. करोडो रुपये त्यांच्यावर उधळले जातात मात्र त्यातून सर्वसामान्य गोमंतकीयांना आनंद मिळत नसतो. अशा इव्हेंटमधून जनतेची लूटच होते. लपलेले नरकासुर मिळेल तिथे हात मारतात. द्वेष मात्र, पुराण कथेतील नरकासुराचाच होतो. गोव्यातील दिवाळी म्हणजे नरकासुर आलेच. नरकासुरांची संख्या काही घटली नाही. जागोजागी नरकासुर वध जल्लोषात झाला. सरकारच्या पर्यटन खात्याने तर शासनमान्य नरकासुर वध पर्वरीत घडवून आणला. त्यासाठी लाखों रुपयांची बक्षिसेही वाटली. याला सरकारी समर्थन म्हणावे नाही तर काय. नरकासुराच्या निमित्ताने होणारा धिंगाणा बंद करायचे सरकारने मनावर घेतले तर बरे होईल. यंदाचा नरकासुर अध्याय आता संपलेला आहे.

नुकतीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांची सांगता झाली. गेली पंधरा वर्षे होणार होणार म्हणून रखडत राहिलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अखेर पार पडल्या. गोव्याच्या क्रीडा क्षेत्रातील हा औत्सुक्याचा आणि ऐतिहासिक क्षण. गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार, हे एक स्वप्नच होते. ते अखेर सत्यात उतरले. या स्पर्धांमुळे गोव्याच्या क्रीडा क्षेत्राला नव्याने हुरुप आला आहे. या निमित्ताने गोव्याच्या क्रीडा क्षेत्रात नवीन पहाट उगवेल अशी आशा आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये गोव्याने चमक दाखविली आहे. 27 सुवर्ण पदकांसह एकूण 92 पदके प्राप्त करण्याचा मान गोव्याने पटकावला. हेही नसे थोडके.

गोव्याच्या कानाकोपऱ्यात उमलते खेडाळू आहेत. त्यांना प्रोत्साहन हवे आहे. मदतीचा हातही हवा आहे. छोट्याशा गोवा राज्यात मागच्या वीस वर्षांत क्रीडा साधन-सुविधांच्या संख्येत वाढ झालेली आहे. आजही शहरांसह ग्रामीण भागात क्रीडा सुविधा उभारण्यात येत आहेत. त्यामुळे गोवा भविष्यातही मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी सक्षम राहील, यात शंका नाही. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वीपणे आयोजन करून राज्याने आपली क्षमता सिध्द केलेलीच आहे. आता राज्यात क्रीडा संस्कृती रुजविण्याची खरी गरज आहे. पूर्वी शाळा तिथे मैदान होते. आता मैदानाविना असंख्य शाळा स्थापन झाल्या आहेत. त्यामुळे मुलांचा मैदानी खेळांकडील ओढा कमी झाला, असे म्हणण्यास वाव आहे. पूर्वी क्रीडा स्पर्धा म्हणजे जत्राच भरायची. आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या सामन्यांनासुध्दा क्रीडाप्रेमींचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. हे चित्र बदलायला हवे. या क्रीडा महोत्सवात जनतेचाही उत्स्फूर्त सहभाग असायला हवा होता. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी साडेचारशे कोटी रुपये खर्च झाले. पाण्यासारखा पैसा वाहून देखील जर राज्याच्या क्रीडा क्षेत्राचा उत्कर्ष होणार नसेल, क्रीडा संस्कृती रूजत नसेल तर... याचा गांभिर्याने विचार भविष्यात व्हायलाच हवा.

आता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येतो आहे. पुढील पंधरा दिवस गोव्यात ‘इफ्फी’ची धूम असेल. महनीय-अतिमहनीय मान्यवरांची गोव्यात वर्दळ असेल. गोमंतकीयांना सिने तारे-तारकांचे दर्शन घडेल. उत्कृष्ट चित्रपटांच्या प्रदर्शनांचा लाभही घेता येईल. गोव्याचे पर्यटनही थोडे अधिकच बहरेल. गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाल्यास आता 19 वर्षे झाली आहेत. या जवळपासच्या दोन दशकांमध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून गोव्याने काय कमावले अन् काय गमावले, हे तपासण्याची ही वेळ आहे. भारतीय सिने जगताला गोव्याचा निसर्ग पूर्वीपासूनच भुरळ पाडतोय. त्यामुळे गोव्याच्या भूमीत चित्रपटांचे चित्रीकरण सर्रास होत असते. अभिनयावर निस्सिम प्रेम करणाऱ्या गोमंतकीय माणसालाही मुंबईच्या चित्रपट सृष्टीचे आकर्षण अनेक दशकांपासून आहे. शिवाय गोवा हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असल्याने केंद्र सरकारही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात व्हावा यासाठी अनुकल होते. 2004 साली गोव्याला लाभलेल्या मनोहर पर्रीकरांच्या झुंझार नेतृत्वाने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात आमंत्रित केले. अल्पावधीत साधनसुविधा उभ्या केल्या आणि आव्हान यशस्वी केले.

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात व्हावा, या मागे काही उद्दिष्टे होती. पहिल्या महोत्सवाचा लखलखाट गोव्यातील प्रत्येक शहरात आणि गावांमध्येही पसरला होता. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पहिली दोन वर्षे वगळता हळूहळू उत्साह ओसरू लागला आणि राहिली केवळ औपचारिकता. आज या चित्रपट महोत्सवात औपचारिकतेपलीकडे फारसे काही राहिलेले नाही. आज गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे कायम केंद्र आहे. गोव्यातच सिनेसृष्टी बहरली तर गोमंतकीय माणूसही या क्षेत्रात आपले भवितव्य नक्कीच घडवू शकतो. गोव्यातही स्वप्ननगरी फुलावी. सिने संस्कृती या भूमीत रुजावी, सिने उद्योग निर्माण व्हावा, अशी भावना गोव्यात ‘इफ्फी’च्या प्रारंभी होती मात्र पुढे ती लुप्त झाली. आताच कुठे गोव्यात फिल्म सिटी उभारण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. ‘इफ्फी’ गोव्यात स्थायिक झालेला आहे. ‘इफ्फी’साठी गोव्याने मागच्या वीस वर्षांत भरीव योगदान दिलेले आहे मात्र ‘इफ्फी’ने गोव्याला काय दिले, हा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.

अनिलकुमार शिंदे

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article