For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वस्थतेकडे वळताना...

06:42 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वस्थतेकडे वळताना
Advertisement

सकाळची वेळ होती. डोअर बेल वाजली. मी दार उघडलं. दाराबाहेर एक मध्यमवयीन ‘स्त्री’ उभी होती. मला हाताने थोडं बाजूला करत तिने थेट घरात प्रवेश केला. ती ज्या व्यक्तीला भेटायला आली आहे ती मीच आहे याची जेमतेम खात्री तिने केली आणि मला बोलायची संधी न देताच तिने बोलायला सुऊवात केली, ‘सॉरी मी फोन वगैरे न करताच आले. अं.. पण कारणच तसं निकडीचं आहे. रोजचं भांडणं सुरू आहे. कधी तिच्या स्वत:च्या समजुतीमुळे गोंधळ उडतो तर कधी तिला वाटतं आपण नाही इतक्मया स्मार्ट, हुशार, दिसायला चांगल्या..एकदम देखणं रूप हवं होतं. अनेक विचार मनात येतात, मग...ती अस्वस्थता..खूप चिडचिड, त्रागा. मग परत तेच चक्र चालू.. पुन: पुन्हा रोजचंच भांडण.’ (त्यांच्या देहबोलीतून त्यांची अस्वस्थता लक्षात येत होती.) मी त्यांना मध्येच थांबवून म्हटलं, ‘तुम्ही प्लीज जरा बसाल का? बसा..हे पाणी घ्या.  हं..आता सारं शांतपणे सांगा पाहू. मला जर नीट समजलं तरच मी काही मदत करू शकेन ना?’ त्यांनी उत्तरादाखल मान डोलावली. ‘बरं मला सांगा कोण कोणाजवळ भांडतंय?’ ‘अरे देवा, मी ते सांगितलंच नाही ना. असाच गोंधळ होतो बघा माझा. इतर कुणी नाही हो माझं. माझ्याशीच भांडण चाललं आहे. इतके विचार येतात की अस्वस्थ व्हायला होतं. तसं पहायला गेलं तर घरात सारी सुखं आहेत. पण, मला कशाचा आनंद घेता येत नाही. काहीतरी मार्ग निघेल या आशेने तुमची वेळ न ठरवताच भेटायला आले.’ असे म्हणत त्या जोरात रडू लागल्या. पाच सात मिनिटे तशीच गेली. त्या शांत झाल्यावर त्यांच्याजवळ झालेल्या संवादातून अनेक गोष्टी समोर आल्या. भूतकाळातील आठवणी, विचार घोळवत रहायची सवय, त्या पद्धतीचे होणारे स्वगत, स्वत:चा न केलेला स्वीकार, न्यूनगंड, पूर्वग्रह अशा अनेक गोष्टी समोर आल्या. या सर्वातून बाहेर पडण्यासाठी वेळ तर जाणारच होता. चर्चेमधून काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्यावर त्याही त्यासाठी तयार झाल्या आणि काही काळ नियमित येत, विविध तंत्रे आत्मसात करत, प्रयत्नपूर्वक त्यातून बाहेर पडल्या.

Advertisement

खरंतर माणसाने आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर खूप प्रगती केली. अनेक सुख सुविधा, भौतिक समृद्धी निर्माण केली, परंतु तरीही स्वत:च निर्माण केलेल्या या जीवनपद्धतीत, समाजव्यवस्थेत तो एवढा ताणतणावाच्या ओझ्याखाली का दडपून गेला आहे हा विचार करायला लावणारा प्रŽ आहे. प्रत्येकाच्या समस्या, त्यावरचे पर्याय हे सारं वेगवेगळं, हे जरी खरं असलं तरी झटकन् येणारी मरगळ, बेचैनी, सातत्याने येणारी मनाची भरती ओहोटी त्यातूनच उभ्या राहणाऱ्या समस्यांचे वाढते प्रमाण हे नजरेआड न करता येण्यासारखे आहे. काही अपवादात्मक परिस्थिती, प्रसंग वगळले तर अनेक ताणतणाव आपले आपणच निर्माण करत असतो.

आपण कसे जगतो, वागतो, कसा विचार करतो यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. एखादी समस्या निर्माण झाली की त्याचा स्वीकार, त्या परिस्थितीकडे, समस्येकडे आपण कसे पाहतो आहोत, तो प्रŽ कशा पद्धतीने सोडवतो आहोत यावरही त्यावेळी येणाऱ्या तणावाचे प्रमाण अवलंबून असते. परंतु ‘पूर्वग्रह’ आणि ‘न्यूनगंड’ या दोन्ही गोष्टी अशा आहेत की, यांनी जर आपल्याला ग्रासले तर आपणच आपले नुकसान करून घेतो. अनेक माणसांना स्वत:चे रूप, रंग, शरीरयष्टी याबाबतीत न्यूनगंड असतो. आपल्यामध्ये काही न्यून, उणिवा, कमतरता आहेत असे त्यांना वाटत असते. काहीवेळा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांनी केलेले एखादे विधान, रंग रूपाच्या बाबतीत नकळत इतरांशी केलेली तुलना, या संदर्भात घडलेला एखादा प्रसंग मनात इतका घर करून राहतो की, ‘माझ्यामध्ये ही कमतरता आहे’ हा विचार सतत मनात घोळत राहिल्याने नकारात्मक विचारांचे प्रमाण वाढून आत्मविश्वास डळमळतो. कालांतराने स्वत:ला ‘अकार्यक्षम’ समजेपर्यंत त्याचा प्रवास होतो. आपल्या मनामध्ये काय विचार येतात याकडे लक्ष न दिल्याने विचारांच्या प्रवाहात वाहत मानसिक दमणूक तर होतेच आणि त्या दमणुकीमध्ये स्वत:मधील अंगभूत कौशल्ये, गुण, अंगभूत क्षमता याकडे दुर्लक्ष होते. अस्वस्थतेखेरीज हाती काहीच उरत नाही.

Advertisement

प्रथमदर्शनी छाप पाडण्यासाठी बाह्य रूपावर अनेक गोष्टी अवलंबून असतात असे जरी वरकरणी वाटत असले तरी ‘बाह्य रूप’ म्हणजेच सर्व काही हा भ्रम आपला आपणच प्रयत्नपूर्वक दूर करायला हवा. आपण सातत्याने स्वत:ला कमी लेखत राहिलो, आपण जसे आहोत तसे स्वत:ला स्वीकारलेच नाही तर स्वत:मधील उणिवा दूर करण्याच्या दृष्टीने, सकारात्मक बदलाच्या, प्रगतीच्या दृष्टीने पाऊल पुढे टाकणे अवघड होईल.

सकारात्मक विचार करणे, स्वत:मधील गुणदोषांसकट स्वत:ला स्वीकारणे आणि त्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न करणे हे मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ, हितावह आणि समाधान देणाऱ्या गोष्टी करण्यासाठी प्रेरक ठरणारी ही महत्त्वाची बाब आहे.

अनेकदा अगोदरच काही ठाम समजुती करून घेतल्याने गोंधळ होतो. उदा. मला ट्रिपला जायला आवडत नाही. प्रवासच नकोसा वाटतो, अमूक एक गोष्ट ना मला आवडणारच नाही वगैरे.. जितक्मया प्रकारच्या नकारघंटा ठामपणे आपण गळ्यात बांधून घेऊ तेवढेच त्या गोष्टीमधे मिळणाऱ्या आनंदापासून आपण वंचित राहू हे लक्षात घेतले पाहिजे. मी मलाच आवडत नाही, मला हे जमत नाही असा नन्नाचा पाढा गिरवण्याची प्रवृत्ती असलेल्या व्यक्ती स्वत:भोवती तर्कशून्य आणि अनावश्यक विचारांची जळमटं करून त्यातच अडकून बसतात.

भूतकाळातील स्मृती, अप्रिय घटना, अपमानास्पद गोष्टी मनात सतत घोळवत राहिल्याने, त्या त्रासदायक, दु:खद भावनांचा पुन:प्रत्यय येऊन अस्वस्थता वाढते. अशा पद्धतीच्या विचारांवर प्रयत्नपूर्वक काम केले गेले नाही तर मानसिक आणि पर्यायाने शारीरिक आरोग्याला धोका पोहचू शकतो.

मानसिक मरगळ झटकून जर पुढे जायचे असेल तर अस्वस्थतेकडून स्वस्थतेकडे मार्गक्रमण करताना स्वत:चा जसे आहोत तसा स्वीकार करून, स्व चा शोध घेऊन विवेकपूर्ण विचारांची कास धरणे आवश्यक आहे. मनाच्या उत्तम मशागतीसाठी सजगतेची विविध तंत्रे आत्मसात करून त्या दृष्टीनेही वाटचाल गरजेची आहे. मनाची मशागत उत्तम असेल तर न्यूनगंड, पूर्वग्रह या गोष्टींना तिथे प्रवेश मिळणारच नाही आणि स्वीकाराचा परिघ विस्तारून प्रगतीच्या दिशेने आपली वाटचाल होईल हे मात्र निश्चित!

 -अॅड. सुमेधा संजीव देसाई

Advertisement
Tags :

.