पहिल्यांदाच नफ्यात आली, ओयो रुम्सची आता कर्ज फेडण्याची घाई
नवी दिल्ली :
पहिल्यांदाच नफ्यात आलेल्या ओयो रूम्स यांनी लवकरच 1600 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार असल्याचे निश्चित केले आहे. कर्जफेड करण्यासंदर्भातली योजना कंपनीने आखली असल्याचे सांगितले जात आहे. भारतातील सर्वात कमी वयाचे अब्जाधीश उद्योगपती रितेश अग्रवाल यांच्या ओयो रूम्स यांनी दुसऱ्या तिमाही मध्ये नफा प्राप्त केला आहे. हा नफा पहिल्यांदाच प्राप्त केला असल्याची माहिती आहे. आगामी काळात कंपनी 1600 कोटी रुपयांचे कर्ज फेडणार आहे. सप्टेंबरला संपलेल्या तिमाहीमध्ये ओयो रूम्सने जवळपास 16 कोटी रुपये निव्वळ नफा प्राप्त केला आहे. रितेश अग्रवाल म्हणाले की कंपनी आपले कर्ज फेडण्यासाठी उत्सुक असून याबाबत अधिक गंभीर आहे. 1620 कोटी रुपयांच्या कर्जावर व्याजाच्या स्वरूपामध्ये वर्षाला जवळपास 225 कोटी रुपये कंपनीला भरावे लागत होते. ज्याची आगामी काळामध्ये कर्ज फेडल्यानंतर बचत होऊ शकणार आहे. कंपनी आगामी काळामध्ये आयपीओ शेअर बाजारामध्ये सादर करण्याची शक्यता वर्तवली जाते.