रात्री 10 नंतर संगीत बंद कराच
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा सक्त इशारा : किनारी भागात रात्रीची गस्त वाढविणार,गोव्याच्या नावाला बट्टा सहन करणार नाही
पणजी : किनारी भागात झपाट्याने वाढणारी गुन्हेगारी आणि त्यामुळे लयास पोहोचलेली कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात आणण्याच्या उद्देशाने सरकारने आता काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्याअंतर्गत रात्रभर धिंगाणा घालणारे कर्णकर्कश संगीत रात्री 10 वाजल्यानंतर सक्तीने बंद करावे लागणार आहे. तसेच अन्य प्रकारची गुन्हेगारी रोखण्यासाठी रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढविण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
गत काही दिवसांमध्ये किनारी भागातील कित्येक शॅक, पब, क्लब आदी ठिकाणी पर्यटक तसेच स्थानिकांवरही हल्ले, मारहाण होण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. त्याशिवाय संगीत रजनीच्या नावाखाली रात्रभर कर्णकर्कश संगीत वाजवून धिंगाणा घालण्याचे प्रकारही अमाप वाढले आहेत. त्याविरोधात लोकांचा आक्रोश होत असतानाही आजपर्यंत कारवाईत ढिलाई दिसून येत होती. त्यातून देशविदेशात सरकारची बदनामी झाली होती. हे प्रकार मोडून काढण्यासाठी यापुढे किनारी भागात रात्रीच्या वेळी सर्वत्र पोलिसांची गस्त वाढविण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित पोलीस स्थानकांमधील 40 टक्के कर्मचारी तैनात करण्यात येतील तर 20 टक्के पोलीस अन्य भागांमध्ये गस्त घालतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
गोव्याच्या नावाला बट्टा सहन करणार नाही
किनारी भागात अनेक शॅक तसेच क्लब आणि पब आदी ठिकाणी झालेली भांडणे, मारहाण आणि चोरी सारख्या गुन्हेगारी प्रकरणातील संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहेत. पर्यटन व्यवसायाला आणि पर्यायाने गोव्याच्या नावाला बट्टा लावणारी अशी प्रकरणे कोणत्याही परिस्थितीत सहन करण्यात येणार नाहीत. गुन्हेगारांवर कठोर कारवाई होईल. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. रात्रीची गस्त वाढविणे हा त्याच प्रयत्नांचा भाग आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
याच पद्धतीने रात्री 10 नंतर वाजणाऱ्या संगीतावर कारवाई करण्यात येईल.
कुणा एका व्यक्ती किंवा समुदायाच्या मनोरंजनासाठी परिसरातील संपूर्ण जनतेस वेठीस धरणे योग्य नव्हे. या संगीतामुळे ज्येष्ठ नागरिक तसेच विद्यार्थीवर्गालाही प्रचंड मनस्ताप सहन करावे लागत असतात. त्यामुळे संगीत रजनीपेक्षा गावात शांतता महत्वाची आहे. हे प्रकारही थांबले पाहिजेत. त्यासाठी रात्री 10 नंतर कोणत्याही प्रकारे मोठ्या आवाजात संगीत वाजविता येणार नाही. तसे केल्यास नियमानुसार कारवाई होणार आहे. किनारी भागात कायदा सुव्यवस्था राखतानाच शांतताभंग करणाऱ्यांनाही कठोर शासन होईल, असोही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
व्हेलनेस फॉरेव्हरचे 14 कोटींचे बील मंजूर
व्हेलनेस फॉरेव्हर या फार्मसीला गोमेकॉकडून अदा करणे बाकी असलेल्या 14 कोटी ऊपये बिलास मंजुरी आणि उसगाव येथील सहकार खात्याच्या ताब्यात असलेली पशुखाद्य प्रकल्पाची जमीन पशुसंवर्धन खात्याकडे वर्ग करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.