तुर्किये-स्वीडन संघर्षाला धक्कादायक वळण
धर्मग्रंथ जाळण्यात आल्याने मोठा तणाव ः स्वीडनमध्ये दोन्ही गटांकडून तीव्र निदर्शने
वृत्तसंस्था/ स्टॉकहोम
तुर्किये आणि स्वीडन यांच्यातील संबंध सध्या कटूतेच्या टप्प्यातून जात आहेत. स्वीडनमध्ये तुर्कियेच्या विरोधात तीव्र निदर्शने सुरू आहेत. याचदरम्यान स्वीडनमध्ये तुर्कियेच्या विरोधातील निदर्शनांदरम्यान धर्मग्रंथाची एक प्रत जाळण्यात आली आहे. या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत तुर्कियेने स्वीडनच्या संरक्षण मंत्र्यांचा प्रस्तावित अंकारा दौरा एकतर्फी रद्द केला आहे. स्वीडनचे संरक्षणमंत्री पॉल जॉन्सन यांचा 27 जानेवारी रोजीचा अंकारा दौरा रद्द करण्यात आला आहे. स्वीडनने तुर्कियेच्या विरोधात घृणास्पद निदर्शनांना सुरू ठेवण्याची मंजुरी दिल्याने आता या बैठकीचे कुठलेच महत्त्व राहिले नसल्याचे उद्गार तुर्कियेचे संरक्षणमंत्री हुलुसी अकर यांनी काढले आहेत.
तुर्कियचे संरक्षण मंत्री अकर यांची जर्मनीच्या रामस्टीनमध्ये नाटोच्या बैठकीदरम्यान भेट घेतली होती. त्यावेळी अंकारा येथील बैठक स्थगित करण्यावर सहमती झाली होती. तुर्कियसोबत स्वीडनचे संबंध अत्यंत महत्त्वाचे आहेत. आगामी काळात संयुक्त सुरक्षा आणि संरक्षणाच्या मुद्दय़ावर भागीदारी वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करू असे स्वीडनचे संरक्षणमंत्री जॉन्सन यांनी ट्विट करत म्हटले आहे.
स्वीडनमध्ये शनिवारी आणि रविवारी अनेक ठिकाणी निदर्शने झाली आहेत. डेन्मार्कमधील जहाल उजव्या विचारसरणीच्या समर्थकांना पोलिसांनी स्टॉकहोम येथील तुर्कियेच्या दूतावासासमोर निदर्शने करण्याची अनुमती दिली आहे. याचदरम्यान तुर्किये आाणि कुर्दिश समर्थक देखील स्वीडनच्या राजधानीत निदर्शने करण्याची योजना आखत आहेत. वाढता तणाव पाहता राजधानी स्टॉकहोममध्ये मोठय़ा प्रमाणावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तणावाचे कारण
नाटोमध्ये स्वीडनला सामील करण्यास तुर्कियेने विरोध दर्शविला आहे. यामुळे स्टॉकहोममध्ये तुर्कियेच्या विरोधात निदर्शने होत आहेत. याचदरम्यान काही निदर्शकांनी धर्मग्रंथाची एक प्रत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने तुर्कियेसोबतचा तणाव अधिकच वाढला आहे. नाटोमध्ये प्रवेशासाठी स्वीडनला तुर्कियेच्या समर्थनाची गरज आहे. आमच्या धर्माच्या विरोधातील कृत्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आड अनुमती देण्याचा प्रकार पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे तुर्कियेच्या विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.
रॅसमस पलुदान चर्चेत
स्थलांतरविरोधी राजकीय नेत्याने तुर्कियेच्या दूतावासामसमीप धर्मग्रंथाची एक प्रत जाळल्याची घटना घडली आहे. डेन्मार्कमधील जहाल उजव्यासरणीशी संबंधित हार्ड लाइन या पक्षाचे नेते रॅसमस पलुदान यांच्या कृत्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. पलुदान यांच्याकडे स्वीडिश नागरिकत्व देखील आहे. पलुदान यांनी यापूर्वीही अशाप्रकारचे कृत्य अनेकदा केले आहे. तुर्कियेच्या विदेश मंत्रालयाने अशा लोकांच्या विरोधात कारवाई करण्याचे आवाहन स्वीडनला केले आहे. सर्व देशांनी इस्लामोफोबियाच्या विरोधात ठोस पावले उचलावीत असे तुर्कियेने म्हटले आहे.