तुर्किये ड्रोन्सचा सर्वात मोठा पुरवठादार
अमेरिका अन् चीनला टाकले मागे
वृत्तसंस्था/ अंकारा
तुर्किये हा देश जगातील सर्वात मोठा लढाऊ ड्रोन पुरवठादार ठरला आहे. तुर्कियेने याप्रकरणी अमेरिका आणि चीनला मागे टाकले आहे. जगात जर 100 ड्रोन विकले जात असतील तर त्यातील 65 ड्रोन्स हे तुर्कियेकडून विकले जात आहेत. सेंटर फॉर न्यू अमेरिका सिक्युरिटीने हा खुलासा केला आहे.
मागील तीन दशकात तुर्किये हा लढाऊ ड्रोन म्हणजेच युसीएव्ही (अनमॅन्ड कॉम्बॅट एरियल व्हीकल)च्या विक्रीत अग्रस्थानी राहिला आहे. युसीएव्हीच्या मार्केटवर त्याचाच सर्वाधिक कब्जा आहे. 1995 ते 2023 दरम्यान तुर्कियने स्वत:चे ड्रोन तंत्रज्ञान, विक्रीत सर्वाधिक वृद्धी केली आहे. यात आत्मघाती ड्रोन म्हणजे कामीकेज देखील सामील आहे.
ड्रोन ट्रान्सफर म्हणजेच प्रोलिफिरेशनवरून तुर्कियेचे नियम सर्वात सुलभ आहेत. याचमुळे विविध देश तुर्कियेकडून ड्रोन्स खरेदी करण्याला प्राधान्य देत आहेत. एकेकाळी ड्रोनच्या मार्केटमध्ये इस्रायल आणि अमेरिकेचे वर्चस्व होते. परंतु आता चीन, तुर्किये आणि इराणने या देशांना मागे टाकले आहे. हे तिन्ही देश स्वस्त दरात सैन्य ड्रोन्स उपलब्ध करत आहेत. यामुळे विविध देश आणि सरकारांकडून या देशांच्या ड्रोन्सना पसंती मिळत आहे. तुर्कियेकडून निर्मित बेरक्तार टीबी2 ड्रोन्स निर्माण करण्यात आला असून त्याला सर्वाधिक मागणी आहे. याचा वापर लीबिया, नागोर्नो-काराबाख आणि युक्रेनमधील हल्ल्यादरम्यान यशस्वीपणे करण्यात आला आहे. 2022 मध्ये 6 देशांनी तुर्कियेकडून बेरक्तार सैन्य ड्रोन्स खरेदी केले. 2014 मध्ये ड्रोन विक्रीत चीन आघाडीवर होता. परंतु 2021 मध्ये तुर्कियेने चीनला मागे टाकले. स्वस्त ड्रोन्स, लवकर पुरवठा आणि युद्धमैदानात मोठी मारकक्षमता या वैशिष्ट्यांच्या बळावर तुर्कियेने याप्रकरणी मोठा पल्ला गाठला आहे.
ड्रोन हस्तांतरण झाले सोपे
1995-2023 पर्यंत 633 ड्रोन्सचे हस्तांतरण झाले आहे. 40 टक्के ड्रोन युरोपला पुरविण्यात आले. मध्यपूर्वेतही ड्रोन्सच्या हालचाली वाढल्या आहेत. तेथे 134 ड्रोन्स पुरविण्यात आले आहेत. यानंतर आफ्रिकेतही ड्रोन्स पोहोचले आहेत. जगभरातील सैन्य ड्रोन्सच्या विक्रीत तुर्कियेची हिस्सादरी 65 टक्के आहे. तर चीन 26 टक्के आणि अमेरिकेची केवळ 8 टक्के हिस्सेदारी राहिली आहे.
पुरवठादार सशस्त्र ड्रोन्सचा पुरवठा
तुर्किये 47
चीन 34
अमेरिका 12
इराण 08
इस्रायल 06
दक्षिण आफ्रिका 03
युएई 03
बेलारुस 01
रशिया 01