युक्रेनकडून रशियावर ‘9/11’ स्टाईल हल्ला
कझानमधील बहुमजली इमारतींवर ड्रोन विमाने धडकवली
वृत्तसंस्था/ मॉस्को, कझान
रशियातील कझान शहरात शनिवारी सकाळी अमेरिकेतील ‘9/11’ सारखा हल्ला झाला. युक्रेनने कझानवर 8 ड्रोन हल्ले केले. त्यापैकी 6 हल्ले बहुमजली निवासी इमारतींवर झाले. कझान शहर रशियाची राजधानी मॉस्कोपासून 720 किलोमीटर अंतरावर आहे. या हल्ल्यातील जीवितहानीबाबत कोणतीही माहिती जारी करण्यात आली नाही. मात्र, या हल्ल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये अनेक ड्रोन इमारतींना आदळल्यानंतर आग लागल्याचे दिसत आहे. या हवाई हल्ल्यानंतर कझानसह रशियाचे दोन विमानतळ बंद करण्यात आले आहेत.
युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा वाढलेला दिसत आहे. दोनच दिवसांपूर्वी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी युक्रेनसोबतचे युद्ध थांबवण्यास तयार असल्याचे सांगितले होते. यासाठी त्यांनी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी बोलण्यास तयार असल्याचे मान्य केले होते. मात्र, एकीकडे चर्चेचा सूर आळवला जात असतानाच दुसरीकडे सामरिक संघर्षही पाहायला मिळत आहे.
हल्ले-प्रतिहल्ले सुरूच
युक्रेनने शुक्रवारी रशियाच्या कुर्स्क सीमेवर अमेरिकन क्षेपणास्त्रs डागली होती. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच रशियाने युक्रेनची राजधानी कीववर हल्ला केला. यात एकाचा मृत्यू झाला. युरोपियन युनियनच्या प्रमुख उर्सुला वॉन डेर लेयन यांच्या म्हणण्यानुसार, कीवमध्ये रशियाने ज्या इमारतीला लक्ष्य केले ती अनेक देशांच्या राजनैतिक मिशनचे काम करत होती. जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी पुतीन यांच्याशी युद्ध संपवण्याबाबत बोलणार असल्याचे सांगितले आहे.
दुसऱ्यांदा रशियावर ‘9/11’ सारखा हल्ला
गेल्या चार महिन्यांपूर्वी रशियावर 9/11 सारखा हल्ला झाला होता. रशियातील साराटोव्ह शहरातील व्होल्गा स्काय या 38 मजली निवासी इमारतीला युक्रेनने लक्ष्य केले. या शहरात रशियाचा स्ट्रॅटेजिक बॉम्बर मिलिटरी बेसही आहे. या हल्ल्यात 4 जण जखमी झाले आहेत. यानंतर रशियाने प्रत्युत्तर देत युक्रेनवर 100 क्षेपणास्त्रे आणि 100 ड्रोन डागली होती. यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला असून 150 हून अधिक जण जखमी झाले होते.
2001 मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी अशाच पद्धतीने 4 विमानांचे अपहरण केले होते. यापैकी 3 विमाने अमेरिकेतील मोठ्या इमारतींवर एकामागून एक धडकवण्यात आली. पहिला अपघात रात्री 8:45 वाजता झाला. बोईंग 767 हे विमान वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या नॉर्थ टॉवरवर वेगाने आदळवण्यात आले होते. त्यानंतर 18 मिनिटांनी दुसरे बोईंग 767 इमारतीच्या दक्षिण टॉवरवर आदळले. या हल्ल्यांमध्ये सुमारे 3000 लोक मारले गेले होते.
रशियाच्या आण्विक प्रमुखाची हत्या केल्याचा आरोप
चार दिवसांपूर्वी रशियाचे अण्वस्त्र प्रमुख इगोर किरिलोव्ह यांचा मॉस्कोमध्ये झालेल्या स्फोटात मृत्यू झाला होता. हल्ल्याच्या वेळी, किरिलोव्ह अपार्टमेंटमधून बाहेर पडत असताना जवळ उभ्या असलेल्या स्कूटरचा स्फोट झाला. यामध्ये किरिलोव्हसोबत त्याचा साहाय्यकही मारला गेला. किरिलोव्ह यांची हत्या युक्रेननेच केल्याचा आरोप रशियन अधिकाऱ्यांनी केला होता. युक्रेनच्या सिक्युरिटी सर्व्हिस एजन्सीशी (एसबीयू) संबंधित एका सूत्राने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती.