इस्रायलवर निर्बंधांची तुर्कियेची मागणी
वृत्तसंस्था / अंकारा
जगातील सर्व मुस्लीम देशांना इस्रायलविरोधात सुरक्षाविषयक आणि आर्थिक निर्बंध लागू करावेत, अशी मागणी तुर्किये या देशाचे प्रमुख एर्डोगन यांनी केली आहे. इस्रायलने गाझा पट्टी आणि लेबेनॉनमध्ये प्रचंड हिंसाचार केला आहे. इस्रायलच्या सेनेने या भागांमध्ये हजारो पॅलेस्टाईन नागरीकांची आणि हिजबुल्ला हस्तकांची हत्या केली आहे. यासाठी त्या देशाचे पंतप्रधान नेतान्याहू यांच्यावर आंततरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयात अभियोगही सादर करण्यात आला आहे. आता मुस्लीम देशांनी इस्रायलची कोंडी करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सर्व मुस्लीम देशांनी इस्रायलवर बहिष्कार टाकावा. त्या देशावर आर्थिक आणि सुरक्षाविषयक निर्बंध लादावेत. तसेच इस्रायलशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले जाऊ नयेत. मुस्लीम देशांनी एकत्रिता दाखविल्यास इस्रायलची कोंडी होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रक्षोभक भाषा एर्डोगन यांनी शुक्रवारी केली आहे.
नुकताच इस्रायलचा शेजारी देश असणाऱ्या सीरीयात सत्तापालट झाला आहे. या देशाची सत्ता आता बंडखोरांच्या हाती गेली आहे. हे गृहयुद्ध या देशात होत असताना, इस्रायलनेही आपल्या सेनेच्या तुकड्या या देशात पाठवून आपल्या सीमेलगतचा या देशाचा भाग ताब्यात घेतला आहे. गोलान टेकड्या आणि त्यांच्याकडे जाण्याचा मार्ग इस्रायने आपल्या हातात घेतला आहे. तसेच सीरीयाची राजधानी दामास्कसवर लक्ष ठेवता येईल असे काही पर्वत आपल्या हाती घेतले आहेत. त्यामुळे एर्डोगन संपप्त झाले होते. त्यामुळे त्यांनी आता मुस्लीम देशांना उसकविण्याचे प्रयत्न चालविला आहे, असा आरोप केला जात आहे.