Wari Pandharichi 2025: टाळ, मृदंगाच्या गजरात आज तुकोबांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान
पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होणार आहे
पुणे : हरिनामाच्या गजरात व टाळ मृदंगाच्या नादात संत शिरोमणी जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखीचे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास देहहून पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. संस्थानच्या वतीने प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी केली आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचीही उपस्थिती राहणार आहे.
सकाळी सहा वाजता वैकुंठस्थान येथील संत तुकाराम महाराज मंदिरात महापूजा करण्यात येईल. त्यानंतर पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात विश्वस्तांच्या हस्ते महापूजा केली जाईल. संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दुपारी दोन वाजता देऊळवाड्यात आगमन होईल. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यास सुरुवात होणार आहे.
पालखी प्रस्थानाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा पाहणी दौरा
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाने व्यापक नियोजन सुरू केले आहे. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी आळंदी व देहू येथे पाहणी दौरा करून सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियोजनाचा आढावा घेतला.
वारी प्रस्थानासाठी 18 जून रोजी देहू आणि 19 जून रोजी आळंदी येथे हजारो वारकरी उपस्थित राहणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्त चौबे यांनी आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर, देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर, पालखी मार्ग, वाहनतळ, गर्दी नियंत्रण व्यवस्था, मनुष्यबळाचे नियोजन आणि आपत्कालीन उपाययोजनांची बारकाईने पाहणी केली.