टुपलोव-142 लढाऊ विमानाचे सुटे भाग जोडण्याचे कार्य युद्धपातळीवर
कारवार : येथील रविंद्रनाथ टागोर समुद्र किनाऱ्यावर दाखल झालेल्या टुपलोव-142 लढाऊ विमानाचे सुटे भाग जोडण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. त्यामुळे टागोर समुद्र किनाऱ्यावर यापूर्वीच उभारलेल्या आयएनएस चपळ युद्धनौका संग्रहालयाच्या बरोबरीने टुपलोव 142 लढाऊ विमान संग्रहालय उभे राहण्याचे दिवस दूर राहिलेले नाहीत. टुपलोव 142 लढाऊ विमानाची मागणी केंद्र सरकारकडे पहिल्यांदा 2017 मध्ये करण्यात आली होती. तथापि येथे लढाऊ विमान संग्रहालय उभारण्यासंदर्भात भारतीय नौदल आणि कारवार जिल्हा प्रशासनादरम्यान करार 2020 मध्ये करण्यात आला. शेवटी 26 सप्टेंबर रोजी विमानाचे सुटे भाग विशाखापट्टण येथून येथे आणण्यात आले. यासाठी ब्ल्यू स्काय संस्थेच्या 9 बृहत वाहनांचा वापर करण्यात आला होता. रशियाकडून खरेदी केलेले हे विमान 1988 मध्ये भारतीय नौसेनेत दाखल झाले होते. 29 वर्षे सेवा बजावलेल्या या विमानाला 2017 मध्ये विश्रांती देण्यात आली होती.
चार क्रेन्सच्या साहाय्याने विमानाचे सुटे भाग जोडण्याचे काम
गेल्या काही दिवसापासून विमानाचे सुटे भाग पुन्हा एकदा जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विमानाचे सुटे भाग उचलण्याची क्षमता असलेल्या क्रेन्स येथे उपलब्ध नसल्याने गोव्याहून 110 टन वजनी वस्तू उचलण्याची क्षमता असलेले क्रेन येथे आणण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अन्य चार क्रेन्सच्या साहाय्याने लढाऊ विमानाचे सुटे भाग जोडले जात आहेत. येत्या काही दिवसात भारतीय नौसेनेची अतिशय प्रामाणिकपणे सेवा बजावलेले टुपलोव 142 लढाऊ विमान येथील समुद्र किनाऱ्यावर विसावलेले दिसणार आहे.