For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुरंगा जल व्यवस्थापन परंपरा

06:30 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुरंगा जल व्यवस्थापन परंपरा
Advertisement

मान्सूनच्या कालखंडात केवळ चार महिन्यांसाठी होणाऱ्या पर्जन्यवृष्टीद्वारे अधिकाधिक पाणी नदी-नाल्यांतून सागरात जात असल्याने, हिवाळ्यापासून पाण्याच्या एकंदर उपलब्धतेसाठी निर्माण होणारा संघर्ष उन्हाळ्यात तीव्र होत असे आणि त्यासाठी हिवाळ्यात वायंगणी शेती आणि बागायती पिकांबरोबर भाजीपाल्याच्या लागवडीला जलसिंचनाची सुविधा लाभावी म्हणून कष्टकरी समाजाला नानाविविध क्लुप्त्या लढवाव्या लागल्या होत्या आणि त्यातून जलसंवर्धन आणि जलव्यवस्थापनाची पारंपरिक अभियांत्रिकी जन्माला आली. गोव्यातल्या काही भागांत त्याचप्रमाणे कर्नाटकातल्या दक्षिण कन्नड जिल्ह्यात आणि केरळातल्या कासरगोड जिल्ह्यातल्या स्थानिकांनी विश्वसनीयरित्या निरंतर पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून सुरंगा जल व्यवस्थापनाच्या तंत्राला जन्म दिला. गोव्यात, दक्षिण कन्नड आणि कासरगोड येथील काही भागांत जेथे जांभ्या दगडांनी युक्त अशी पठारे आहेत, तेथे पावसाच्या कोसळणाऱ्या पाण्याचा संचय व्हावा आणि गरजेनुसार पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून उतारावरती 30 ते 40 मीटरपर्यंत भुयार खोदून भूजल गुरुत्वाकर्षणाच्या तंत्राने एकत्रित प्राप्त व्हावे म्हणून जलाशयाच्या निर्मितीला प्राधान्य दिले होते.

Advertisement

पाणी कुठे आणि कसे उपलब्ध होईल, याचा सातत्याने वेध घेण्यासाठी तत्कालीन लोकसमुहाने प्रयत्न आरंभले होते आणि त्यामुळे जेथे जशी परिस्थिती तेथे त्यानुसार जल व्यवस्थापन आणि जलसंचयाचे तंत्र विकसित करण्याचे प्रयत्न झाले. भूजलाचे निसर्गत: पुनर्भरण होत असले तरी ते अधिकाधिक प्रमाणात व्हावे, यासाठी स्थानिक प्रजातीच्या वृक्ष लागवडीला आणि त्यांच्या संगोपनाला प्राधान्य दिल्यावरती, पावसाचे वाहते पाणी जमिनीत मुरणे सुलभ होते आणि त्यामुळे भूजलाचा स्तर वृद्धिंगत करणे शक्य असते. जमिनीवर समपातळी बांध घालून जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढवून जलसंसाधरणाची क्षमता विकसित करण्यात आली. पावसाळ्यानंतर पाणी उपलब्ध व्हावे म्हणून माणसाने विहिरी, तलाव खोदले आणि तरीसुद्धा पाणी उपलब्ध होण्यास प्रश्न उद्भवले तेव्हा भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी कूपनलिका खोलवर खोदल्या. अशा कूपनलिकांची संख्या वाढल्याने जमिनीतील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे आणि त्यासाठी पाण्याचे प्रमाण टिकविण्यासाठी अशा कूपनलिका खोलवर न्याव्या लागल्या. भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चालल्याकारणाने, सुरंगा या जल व्यवस्थापन तंत्राचा आधार घेण्याला शेतकरी आणि बागायतदारांनी एकेकाळी प्राधान्य दिले होते. जांभ्या दगडाच्या नैसर्गिक आच्छादन लाभलेल्या पठारावरती जेव्हा पर्जन्यवृष्टी होते, तेव्हा हे पाणी भूगर्भात मुरते आणि त्यामुळे भूजलाचा स्तर सुरक्षित राहतो, याविषयीची जाणीव तत्कालीन लोकमानसाला एकंदर निरीक्षणाद्वारे झाली होती. फोंडा तालुक्यातील भूतखांबचे पठार हे त्याच्या पायथ्याशी वसलेल्या सावईवेरे, केरी, प्रियोळ आदी गावांना झऱ्यांच्या साखळीद्वारे निरंतर पाणी पुरवत असल्याकारणाने पाण्याचे नैसर्गिक कोठार ठरलेले आहे. पूर्वी हे पठार स्थानिक प्रजातींच्या वृक्षवेलींबरोबर तृणपात्यांनी नटलेले होते आणि त्यामुळे पावसाचे कोसळणारे पाणी जसे वाहत जाऊन ओहोळांना प्रवाहित करीत आलेले आहे, त्याचप्रमाणे भूजलाची पातळी वृद्धिंगत करीत असते.

गोव्यातल्या ब्राह्मण आणि बिगर ब्राह्मण समाजात शेती आणि बागायती हे उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन होते. आजच्या काळातही चित्पावन, कऱ्हाडे आणि पद्ये ब्राह्मणांनी शेकडो वर्षांपासून बागायती पिकांनी समृद्ध असणाऱ्या हिरव्यागार कुळागरांत वास्तव्यास प्राधान्य दिलेले आहे. गोव्यातल्या पद्ये ब्राह्मणांसंदर्भात कोकणाख्यानात ‘ते अनंत उर्ज देशाप्रती। वृत्ती करिती आगराची।’ असा उल्लेख आढळतो. कुळागरात राहणाऱ्या पद्ये ब्राह्मणांनी अंत्रुज महालातल्या गावांत राहताना, जेथे पेयजल आणि सिंचनाची उपलब्धता आहे, त्या परिसराला विशेष प्राधान्य दिले. भूतखांब पठारावरती जलपुनर्भरणाची प्रक्रिया सुरळीतपणे होते आणि त्यामुळे हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात त्यांच्या पाटात नैसर्गिक जलस्रोतांतले पाणी खेळते राहते आणि त्यात खंड पडू नये म्हणून इथल्या पद्ये ब्राह्मणांनी कष्टाच्या कामाचे उपजत कौशल्य आणि तंत्र असणाऱ्या आदिवासी गावडे जमातीच्या मदतीने सुरंगा जलव्यवस्थापनाचा विनियोग करणे शेकडो वर्षांपासून आरंभले होते. आज प्रियोळहून सावईवेरेत येताना वाटेत जे भूतखांब पठार लागते, तेथे वळणावरती शितोळ तळे, जांभ्या दगडाच्या बांधकामाचे जीर्णावशेष, सुरंगा जलव्यवस्थापन तंत्राची आठवण करून देणारी भुयारसदृश्य संरचना पाहायला मिळते. पावसात भूतखांब पठारावरचे पाणी चोहोबाजूच्या ओहोळातून प्रवाहित होण्याबरोबर तेथील भूजलाच्या स्तराला वृद्धिंगत करत असते. त्यामुळे पठारावरचे काही पाणी व्यवस्थितपणे गोळा होऊन त्याचे संवर्धन आणि व्यवस्थापन व्हावे म्हणून तेथे तळ्याची निर्मिती केली होती. या तळ्यातले पाणी कुळागरांत नेण्यासाठी भुयारे खोदण्यात आली होती.

Advertisement

जांभ्या दगडात भुयारे खोदण्यासाठी टोकदार कुदळीचा कल्पकतेने वापर व्हायचा आणि अशा भुयारातून पाणी व्यवस्थितपणे प्रवाहित व्हायचे. पावसाच्या पाण्याचा अपव्यय न करता, ते वाहून जाण्यापासून रोखण्यासाठी पर्जन्य जल पुनर्भरणाची प्रक्रिया उपयुक्त आणि प्रभावी ठरलेली आहे. लोखंडी टोकदार अशा कुदळीचे घाव घालून जांभ्या दगडाच्या उतारावरती कोठे भुयार खोदल्यावरती पाणी प्रवाहित राहणार, याचे पारंपरिक ज्ञान असणारे कारागिर असायचे. त्यांच्या कौशल्य आणि तंत्राचा वापर करून हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या काळात जलसिंचनाच्या अभावी आपली शेती आणि बागायती निकामी ठरू नये म्हणून बागायतदार विशेष दक्ष असायचे. पुत्रवत वृक्षवेलींवरती जीव असणाऱ्या बागायतदारांनी सुरंगा जलव्यवस्थापनाच्या तंत्रज्ञानाद्वारे आपल्या कुळागरात पाणी खेळते ठेवण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले होते. आज भूतखांबच्या शितोळ तळ्याच्या परिसरात त्याचप्रमाणे फोंडा तालुक्यातल्या काही भागांत सुरंगा जलव्यवस्थापनाचा वापर करण्यात येत असल्याचे मोजकेच पुरावे दृष्टीस पडतात.

सुरंगा हा कन्नड भाषेतला भुयारासाठी वापरला जाणारा शब्द असून, मल्याळम् भाषेत थुरंगम्, थोराप्पू अशी संज्ञा आहे. जांभ्या दगडात उपलब्ध जलस्रोतांचा शोध लागेपर्यंत कारागिर उत्खनन करून भुयाराचे खोदकाम करतो. पठारावरती पावसाचे मुरणारे पाणी, भूगर्भात जात असल्याने, ते पाणी उपलब्ध करण्यासाठी सुरंगा जल व्यवस्थापनाचा उपयोग शेकडो वर्षांपासून प्रचलित आहे.

महाराष्ट्रातून केरळातल्या कर्नाटक सीमेला भिडणाऱ्या कासरगोड जिल्ह्यात वास्तव्यास असणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण समाजाने आपल्या कुळागरांना जलसिंचनाची सुविधा प्राप्त व्हावी म्हणून सुरंगांची निर्मिती केली होती. प्राचीन मेसापोटामिया संस्कृतीतून इराण, इराकात अशा स्वरुपाचे पारंपरिक जल व्यवस्थापनाची संरचना अस्तित्वात होती. रेशम मार्गाद्वारे भारतभर व्यापारप्रीत्यर्थ ये-जा करणाऱ्या व्यापाऱ्यांनी सुरंगाच्या तंत्राचा प्रचार दक्षिण भारतात केल्याचे मानले जाते. मेसापोटामिया संस्कृतीतून आलेले सुरंगाचे जल व्यवस्थापन मोजक्याच प्रांतात कसे काय पाहायला मिळते, याविषयी अधिक संशोधन झाले तर जल पुनर्भरण आणि जल व्यवस्थापनाच्या पारंपरिक संचिताच्या विस्मृतीत गेलेल्या असंख्य पैलूंचे रहस्य उघडकीस येईल.

- राजेंद्र पां. केरकर

Advertisement
Tags :

.