तुळशी विवाह रविवारपासून
बेळगाव : यंदा कार्तिक एकादशी दोन दिवस आहे. शनिवारी (दि. 1) स्मार्त एकादशी व रविवारी (दि. 2) भागवद् एकादशी आहे. भागवद् एकादशीलाच सुक्षेत्र पंढरपूर येथे यात्रा होणार असून त्याच्या दुसऱ्या दिवसापासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. पण, स्मार्त संप्रदायाची एकादशी शनिवारी असल्याने ते रविवारपासून (दि. 2) पौर्णिमेपर्यंत (दि. 5) व भागवद् संप्रदायाने सोमवारपासून (दि. 3) पौणिमेपर्यंत (दि. 5) केव्हाही आपल्या सोयीनुसार तुळशी विवाह करावा, अशी माहिती पुरोहित वसंत जोशी गुरुजी यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली. सण-उत्सवांप्रमाणे तुळशी विवाहही मोठ्याने साजरा करण्याची प्रथा आहे. तुळशी विवाह केल्यास आपल्या मुला-मुलींचे विवाह लवकर जुळून येतात, अशी धारणा असल्याने ते घरोघरी होत असतात.
चातुर्मासाचा समारोप
आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी ते कार्तिक (प्रबोधिनी) एकादशी या चार महिन्यांच्या काळाला चातुर्मास असे म्हटले जाते. यंदा चातुर्मासाला आषाढी एकादशीला (रविवार दि. 6 जुलै) सुरुवात झाली. आता कार्तिक एकादशी (रविवार दि. 2 नोव्हेंबर) रोजी चातुर्मासाचा समारोप होणार आहे. चातुर्मासाचा काळ हा उपासना करण्यासाठी व ती वाढविण्यासाठी फारच अनुकूल असतो. या काळात केलेली उपासना विशेष फलदायी ठरते, अशी धारणा असल्याने आजही जुनी जाणती मंडळी चातुर्मासात व्रतवैकल्ये करताना दिसून येतात, अशी माहितीही जोशी गुरुजी यांनी यावेळी बोलताना दिली.