काकती, होनगा, बंबरगा परिसरात तुळशी विवाह सोहळा उत्साहात
काकती : काकती, होनगा, बबंरगा परिसरात तुळशी विवाहाचा, लग्नसोहळा घरोघरी सर्व विधीवत मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. तुळशीला आपली मुलगी मानून तिचे लग्न भगवान विष्णूशी लावून देण्याची यामागील पवित्र भावना आहे. एकादशीपासून ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत चालणारा हा सोहळा येथे मंगळवारी व बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. काहींच्या घरासमोर व परड्यासमोर असलेल्या तुळशी वृंदावनाची कुंडी सुशोभित रंगविण्यात आली. तुळशीच्या रोपट्याला सजविण्यात आले. मंगळसूत्र, बांगड्या, सौभाग्य लेणं अर्पण करण्यात आले. तर भगवान विष्णूचे प्रतिक म्हणून शाळीग्राम, कुठे श्रीकृष्णाची मूर्ती, देव्हाऱ्यातील बाळकृष्णाची मूर्ती ‘वर’ म्हणून तुळशीपाशी ठेवण्यात आली. तुळशीच्या कुंडीभोवती उसाचा मंडप उभारण्यात आला. मंडपाला आब्यांच्या पानाचे तोरण, झेंडूची फुले व रंगीबेरंगी विद्युतरोषणाईने सजविण्यात आले होते.
या विवाहासाठी या हंगामातील आवळा, चिंच, रताळी ठेवण्यात आली होती. देवाला अर्पण करण्यासाठी मिठाई, चिरमुरे हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी श्री गणेशाची आरती, काही ठिकाणी जमेल तसे पुरोहितांकडून, घरातील जाणत्यांकडून ‘शुभ मंगल सावधान’ ही मंगलाष्टके म्हणण्यात आली. अंतरपाट धरून अक्षता टाकण्यात आल्या. दिवे लागणीच्यावेळी विवाह संपन्न झाल्यावर तुळस व भगवान विष्णूची आरती झाली. कर्त्या पुरूषाकडून श्रीफळ वाढवण्यात येऊन सर्वांना प्रसाद वाटण्यात आला. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा करण्यात आला. हा सोहळा केवळ धार्मिक विधी नसून, तो भक्ती, परंपरा, आणि निसर्गाप्रती कृतज्ञतेच्या भावनेचा एक सुंदर संगम दिसून आला आहे. या सणापासून विवाहांचे शुभ मुहूर्त सुरू होतात. घरात येणारी नववधु ही ‘लक्ष्मी’ असून घरच्या ऐर्श्वयाचे प्रतिक मानतात. हा सण आपल्या ग्रामीण संस्कृतीत निसर्ग आणि देव यांच्यातील अतूट नाते दर्शविते.