तुळशी विवाह सोहळा उद्यापासून
पणजी : कार्तिकी एकादशी उत्सव आजही करता येईल किंवा रविवारी देखील करता येईल, तर तुलसी विवाह रविवारपासून सुरू होणार आहे. कार्तिकी एकादशी आणि तुलसी विवाह सोहळा याबाबत अनेकांमध्ये बरेच संभ्रम होते, मात्र गोव्यातील नामवंत ज्योतिष विद्यावाचस्पती वे. भालचंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी एकादशी उत्सव आहे. स्मार्तमध्ये प्रबोधिनी एकादशी पाळली जाते. त्यानुसार स्मार्त मंडळी आज एकादशी पाळू शकतात. भागवत एकादशी व साखळीच्या श्री विठ्ठल मंदिरात जो एकादशी उत्सव होतो तो रविवारी 2 नोव्हेंबर रोजी होईल. एकादशी आणि द्वादशी क्षय आहे. आज शनिवारी सकाळी नऊ वाजून बारा मिनिटांनी एकादशी उत्सवाला सुऊवात होते.आपल्या धर्मनियमानुसार त्याचबरोबर दाते पंचांग ज्याचा आपण पालन करतो त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या दिवसाची सुऊवात ज्या तिथीने होते तो दिवस त्या तिथीचा मानला जातो.
म्हणजे शनिवारी एकादशी सुरू होते ती दिवस उजाडण्यापासून नव्हे तर नंतर सुरू होते. याउलट रविवारी सकाळी 7. 35 पर्यंत एकादशी राहील व त्यानंतर द्वादशी सुरू होते. परिणामी एकादशी उत्सव हा रविवारी होईल. सायंकाळच्या वेळी तुलसी विवाह सोहळा आयोजित केला जातो. रविवारी सुरू होणारी द्वादशी दुसऱ्या दिवशी दुपारी संपुष्टात येते म्हणजे सायंकाळी द्वादशी मिळत नाही. त्यामुळे रविवारपासून तुळसी विवाह सोहळा आयोजित करण्यास हरकत नाही आणि कार्तिकी पौर्णिमा म्हणजे 5 नोव्हेंबरपर्यंत तुलसी विवाह सोहळा आयोजित करण्यास हरकत नाही. काहीवेळा विविध शास्त्रांचा आधार घेऊन ही कोष्टके तयार केली जातात. वेदमूर्ती भालचंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार कार्तिकी एकादशी सोहळा स्मार्त मंडळींनी आज करावा तर भागवत परंपरा सांभाळणाऱ्या भक्तांनी रविवारी महाएकादशी उत्सव करावा व त्या दिवशी उपवास करावा. ज्या मंडळींना द्वादशीचा मुहूर्त धरून तुळशी विवाह करायची इच्छा असेल तर त्यांना रविवारी तुळशी विवाह करण्यास हरकत नाही.