तुळशी विवाह साहित्य बाजारात दाखल
आजपासून प्रारंभ, फळा, फुलांची अन् उसाची आवक : आकर्षक तुळशी वृंदावनही दाखल
बेळगाव : तुळशी विवाहाला बुधवारपासून प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर बाजारात तुळशी पुजेचे साहित्य दाखल झाले आहे. ऊस, तुळशी वृंदावन, हिरवा चुडा, चिंच, आवळे आणि इतर विविध फळांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पुढील तीन दिवस म्हणजेच शुक्रवारपर्यंत तुळशी विवाहाची धामधूम पहावयास मिळणार आहे. दसरा, दिवाळीनंतर आता तुळशी विवाहासाठी बाजारात ऊस, फुलांची आवक वाढू लागली आहे. काकतीवेस, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, मारूती गल्ली, कडोलकर गल्ली आदी ठिकाणी विक्री होऊ लागली आहे.
त्याचबरोबर बाजारात विविध आकाराच्या आकर्षक तुळशी वृंदावनही दाखल झाल्या आहेत. साधारण 300 ते 2000 हजार रुपयापर्यंत यांच्या किमती आहेत. रंगीबेरंगी सिरॅमीकच्या कुंड्या आकर्षक ठरू लागल्या आहेत. मंगळवारी कार्तिक एकादशी आणि तुळशी विवाहासाठी बाजारात नागरिकांची वर्दळ वाढली होती. तुळशी विवाहाच्या पार्श्वभूमीवर बाजारात मंगळवारी फळा, फुलांची आणि उसाची आवक वाढली आहे. तुळशी विवाहासाठी झेंडूच्या फुलाबरोबर उसाचा वापर केला जातो. बुधरवारपासून तुळशी विवाहांना प्रारंभ होणार आहे. पुढील तीन दिवस हा सोहळा चालणार आहे. यासाठी बाजारात तुळशीच्या पुजेसाठी लागणाऱ्या साहित्याची लगबग दिसत आहे.