मंगलमय वातावरणात तुळसी विवाहाला प्रारंभ
बेळगाव प्रतिनिधी - शहर परिसरात शनिवारपासून तुळसी विवाहाला मंगलमय वातावरणात प्रारंभ झाला आहे. त्यामुळे दिवाळी, पाडवा, भाऊबीज नंतर आता तुळसी विवाहाची धामधूम सुरु झाली आहे. शनिवारी सायंकाळी शहर आणि उपनगरात पारंपारिक पद्धतीने तुळसी विवाह पार पडले.
कोरोनाच्या संकटानंतर यंदा तुळसी विवाह थाटात साजरे होत आहेत. त्यामुळे सर्वत्र उत्साही वातावरण दिसून येत आहे. याबरोबरच बाजारात तुळसी विवाह पूजेच्या साहित्यांची मागणी वाढली आहे. विशेषत: तुळसीचे नवे रोप, कुंडय़ा, ऊस, रांगोळी, हिरवा चुडा, झेंडूची फुले, हळदी-कुंकू, आवळे, चिंच आणि अंतरपाठला मागणी वाढली आहे. मागील दोन वर्षात सण-उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. मात्र यंदा सण-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होत आहेत. त्यामुळे तुळसी विवाह देखील धुमधडाक्यात होत आहे.
शनिवारपासून सुरु झालेले तुळसी विवाह मंगळवार दि. 8 रोजीच्या तुळसी पौर्णिमेपर्यंत चालणार आहेत. या पार्श्वभूमीवर बाजारात तुळसी विवाहाची खरेदी वाढली आहे. हिरव्या बांगडय़ांचा चुडा असलेली पाकिटे, कापसाच्या वाती, नारळ, ऊस, चिरमुरे, बत्ताशा यासह हार-फुलांना देखील मागणी वाढली आहे. याबरोबर तुळसी विवाहासाठी लागणारे पुस्तके, आरती संग्रह बाजारात दाखल झाले आहेत. विशेषत: झेंडूच्या फुलांची आणि ऊसाची आवक वाढली आहे. साधारण 60 ते 70 रुपयाला पाच ऊस अशी विक्री सुरु आहे. त्याबरोबर तुळसी विवाहासाठी फळांची मागणी वाढली आहे. पाच फळांचा नग 70 रुपयाला विकला जात आहे. पुढील दोन तीन दिवस तुळसी विवाह चालणार असल्याने बाजारात खरेदीची लगबग पहायला मिळत आहे.
शहर परिसरात तुळसी विवाहाची धामधूम शहर परिसरात शनिवारी सायंकाळी तुळसी विवाहाची धामधूम पहायला मिळाली. घराच्या अंगणात किंवा परिसरात असलेल्या तुळसीचा विवाह पारंपारिक पद्धतीने पार पडला. कोरोना निर्बंधानंतर यंदा तुळसी विवाहाला थाटात आणि चैतन्याच्या वातावरणात सुरुवात झाली.