तुलसी माहात्म्य
चातुर्मासाच्या आणि कार्तिक महिन्याच्या शेवटी तुळसी विवाह आनंदाने साजरा केला जातो. पण तुळशीला एवढ्यासाठीच मर्यादित न ठेवता आपल्या घरासमोर तुळसी वृंदावन ठेवून त्याची दररोज सेवा करावी. भागवत धर्मामध्ये तुळशीला दैनंदिन जीवनात अत्याधिक महत्त्व आहे. संत तुकाराम आपल्या अनेक अभंगातून तुळशीचे महत्त्व पटवून देतात.
सर्वप्रथम विठ्ठलाला तुळशीमाळ विशेषकरून आवडते. एका प्रसिद्ध अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ।।1।।तुळसी हार गळां कासे पीतांबर। आवडे निरंतर हेंचि ध्यान ।।ध्रु ।। मकरकुंडले तळपती श्र्रवणी। कंठी कौस्तुभमणि विराजित ।।2।।तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें।।3।।अर्थात ‘अतिशय सुंदर असे विठ्ठलाचे ध्यान, कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहे. त्याच्या गळ्यात तुळशीचा हार आहे, पीतांबर नेसलेला आहे असे हे विठ्ठलाचे रूप मला नेहमीच आवडते. मासोळीच्या आकाराची कुंडले त्याच्या कानात झळकत आहेत, गळ्यात कौस्तुभमणी धारण केलेला आहे. तुकाराम महाराज म्हणतात की, हे ध्यान माझे सर्वसुख आहे असे सुशोभित ध्यान मी नेहमी आवडीने पाहीन.
एवढेच नाही तर अशा तुळशीमाळा धारण केलेले विठ्ठलाचे स्वरूप कायम पहात रहावे अशी भावना व्यक्त करताना तुकाराम महाराज म्हणतात, कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसें रूप डोळां दावीं हरी ।।1।।ठेविले चरण दोन्ही विटेवरी। ऐसें रूप हरी दावीं डोळां ।।ध्रु।।कटी पीतांबर कास मिरवली । दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ।।2।। गऊडपारावरी उभा राहिलासी। आठवें मानसीं तेचि रूप ।।3।।झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां । येईं पंढरीनाथा भेटावया।।4।। तुका म्हणे माझी पुरवावी आस। विनंती उदास करूं नये ।।5।। अर्थात ‘विठुराया कमरेवर हात ठेवून, गळ्यात तुळशीमाळा धारण करून उभा आहे, हे हरी असे रूप मला वारंवार दाखव. दोन्ही पाय विटेवर ठेवलेले असे तुझे रूप माझ्या डोळ्यांना दाखवावे. कमरेला पितांबर कास शोभून दिसते आहे असे रूप मला दाखव. गऊड पारावार उभे असलेले तुझे रूप मला नेहमी आठवते. या गोड स्वरूपाच्या आठवणीने माझे शरीर अस्थिपंजर बनू लागले आहे तेव्हा हे पंढरीराया, मला भेटायला ये. तुकाराम महाराज म्हणतात की, माझी एवढी आस पूर्ण करावी माझ्या प्रार्थनेचा अव्हेर करू नये’
भागवत धर्माचे पालन करणारे हरिभक्त आपल्या दररोजच्या जीवनात काही तत्त्वांचे पालन करतात. अशामध्ये एक आहे घरासमोर तुळशी वृंदावन ठेवणे आणि त्याची सेवा करणे. तुकाराम महाराज अशा धार्मिक तत्त्वांचे पालन सर्वांनी करावे यासाठी म्हणतात, जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत सर्व लोकीं ।।1।।त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ।।ध्रु.।। जयाचिये द्वारिं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ।।2।। जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ।।3।। विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड। प्रत्यक्ष तें कुंड चर्मकांचें ।।4।। तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ।।5।। अर्थात ‘जो नेमधर्म एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेतासमान समजला जावा. काळही त्याच्यावर रागावून करकरा दात खात असतो. ज्याच्या दारामध्ये तुळशीवृंदावन नाही, ते घर स्मशानाप्रमाणे आहे असे समजावे. ज्याच्या कुळामध्ये एकही वैष्णव नाही त्याचे संपूर्ण कुळच भवनदीच्या त्रिविधतापात बुडते. ज्या मुखामध्ये विठ्ठलाचे नावच येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजावे. तुकाराम महाराज म्हणतात, जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लाकडाप्रमाणे असतात असे मानावे.’
ज्याच्या अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे आणि गळ्यामध्ये तुळशीमाळ आहे अशा हरिभक्तांच्या घरात विठ्ठलाचा निवास असतो. तुकाराम महाराज म्हणतात, सोलीव जें सुख अतिसुखाहुनि । उभें तें अंगणीं वैष्णवांच्या ।।1।। वृंदावन सडे चौक रंग माळा। नाचे तो सोहोळा देखोनियां ।।ध्रु।। भूषणमंडित सदा सर्वकाळ । मुद्रा आणि माळ तुळसी कंठीं ।।2।। नामओघ मुखीं अमृताचें सार। मस्तक पवित्र सहित रजें ।।3।। तुका म्हणे मोक्ष भक्ताचिया मना । नये हा वासना त्याची करी ।।4।। अर्थात ‘जो आत्यंतिक सुखाचा गाभा आहे तो विठ्ठल वैष्णवांच्या अंगणात येऊन उभा राहतो. अशा वैष्णवांच्या अंगणात तुलसी वृंदावन असते, सडा घातला जातो, रंगीबेरंगी रांगोळ्या घातल्या जातात हा सर्व सोहळा पाहून पांडुरंग आनंदाने नाचतात. अंगावर गोपीचंदनाची मुद्रा, गळ्यात तुळशीच्या माळा इत्यादी भूषणांनी वैष्णव सर्वकाळ सुशोभित असतात. वैष्णवांच्या मुखात अमृताचेही सार असलेल्या हरिनामाचा ओघ सारखा वहात असतो आणि त्यांचे मस्तक हरीच्या चरणधुळीने पवित्र झालेले असते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा वैष्णव भक्तांना मोक्षप्राप्तीची इच्छा नसते उलट मोक्षालाच हरिभक्तांचा संग करण्याची इच्छा असते.’
घरासमोरील तुलसी वृंदावनामुळे वैकुंठाचे वातावरण निर्माण होते आणि अशा ठिकाणी यमदूत आणि काळही फिरकत नाहीत असे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात, जेथें वैष्णवांचा वास । धन्य भूमी पुण्य देश ।।1।।दोष नाहीं ओखदासी । दूत सांगे यमापाशीं ।।ध्रु.।।गऊडटकयांच्या भारें । भूमि गर्जे जयजयकारें ।।2।।सहज तयां जनां छंद । वाचे गोविंद गोविंद ।।3।।तुळसीवनें रंगमाळा । अवघा वैकुंठसोहळा ।।4।। तुका म्हणे भेणें । काळ नये तेणें रानें ।।5।। अर्थात ‘जेथे वैष्णवांचा वास असतो, ती भूमी व तो देश पुण्यवान आहे. त्या ठिकाणी थोडेसुद्धा दोष नाहीत, असे यमाचे दूत यमास सांगत आहेत. गऊडाचे चिन्ह असलेल्या पताकांच्या भाराने आणि हरिनामाच्या जयजयकाराने ही भूमी दुमदुमून जात असते. तेथील लोकांना गोविंदाच्या नामस्मरणाचा सहजच छंद लागलेला असतो. खरोखरी तुळशी वृंदावने रांगोळ्या हा सुखसोहळा म्हणजे एक सर्वप्रकारे वैकुंठाचा सोहळाच आहे. तुकाराम महाराज म्हणतात भीतीने काळदेखील अशा ठिकाणी फिरकत नाही.’
आणखी एका अभंगात भगवान श्रीकृष्ण केवळ तुळशीचे पान अर्पण केल्याने प्रसन्न कसे होतात याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, एवढा प्रभु भावें । तेणें संपुष्टी राहावें ।।1।। होय भक्तीं केला तैसा । पुरवी धरावी ते इच्छा ।।ध्रु.।। एवढा जगदानी । मागे तुळसीदळ पाणी ।।2।। आला नावारूपा । तुका म्हणे झाला सोपा ।।3।।अर्थात ‘हरी हा फार महान आहे, तरीही तो भक्तांच्या लहान अशा हृदयात वास करतो. त्याची भक्ती आपण कशाप्रकारे करू तशाप्रकारे तो आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो. संपूर्ण विश्वाचे दान देणारा एवढा महान देव भक्तांना केवळ तुळशीचे पान आणि पाणी मागतो. तुकाराम महाराज म्हणतात, भक्तांच्या भक्तीचा स्वीकार करण्यासाठी एवढे सोपे साधन तो स्वीकारतो म्हणून तो नावारूपासही
येतो.
जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांची भेट संत तुकाराम महाराजांशी झाली तेव्हा त्यांनाही गळ्याभोवती तुळशी माला घालण्याचा उपदेश केला. गळ्यामध्ये तुळशी माला घालणे म्हणजे आपण भगवंताचे सेवक आहोत याचा स्वीकार करणे आणि व्यवहार करणे. आम्ही तेणें सुखी। म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखीं ।।1।। तुमचें येर वित्त धन। ते मज मृत्तिकेसमान ।।ध्रु।।कंठीं मिरवा तुळसी । व्रत करा एकादशी ।।2।।म्हणवा हरीचे दास । तुका म्हणे मज हे आस ।।3।। अर्थात ‘अहो शिवराय, तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा म्हणजे आम्ही सुखी होऊ, अन्यथा तुमची धनसंपत्ती आम्हाला मातीमोल वाटते. गळ्यामध्ये तुळशीमाळ घालून ते भूषण लोकात मिरवा आणि त्याचबरोबर एकादशी व्रत पालन करा. तुकाराम महाराज म्हणतात, अशा प्रकारे वागून स्वत:ला हरिचे दास म्हणवून
घ्या हीच माझी एकमेव इच्छा आहे.’ अशी
ही बहुगुणी तुळस प्रत्येकाच्या दारासमोर असावी.
-वृंदावनदास