For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमित शहा विरूध्द पवार-ठाकरे

06:47 AM Nov 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
अमित शहा विरूध्द पवार ठाकरे
Advertisement

विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. देशातील प्रत्येक पक्षाचे बडे नेते महाराष्ट्रात येऊन प्रचारसभा घेत आहेत, या सभांमधून एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. लोकसभा निवडणुकीत अमित शहा यांनी शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना टार्गेट केले होते, मात्र शहा आणि मोदी यांनी विचालेला जाब राज्यातील जनतेला रूचला नसल्याचे लोकसभा निवडणुकीच्या निकालात दिसले. आज शहा यांच्या मुंबईतील घाटकोपर आणि बोरीवली या भाजपच्या बालेकिल्ल्यात सभा होत आहेत, घाटकोपर येथे लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केल्यानंतरही येथील भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांचा पराभव झाला होता. आता कोटेचा पुन्हा विधानसभा निवडणूक लढवित आहेत.

Advertisement

सध्या महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तरी निवडणुकीच्या निमित्ताने निकालानंतर एकत्र बसुन पुढील निर्णय घेतला जाईल असे शहा यांनी रविवारी सांगितले. यापुढे जाऊन शहा यांनी महत्त्वाचे विधान केले ते असे की आम्ही निकालानंतर शरद पवारांना कोणतीही संधी देणार नाही. शहा यांच्या विधानावऊन एक गोष्ट कळते की शरद पवार हे कोणत्याही परिस्थितीत भाजपला पुन्हा एकदा राज्यात सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

भाजपची खेळी भाजपवरच उलटवणारे आज महाराष्ट्रात एकमेव नेते आहेत ते म्हणजे शरद पवार. लोकसभा निवडणुकीत इतर राज्यात भाजपला यश मिळत असताना महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात भाजपचा वारू रोखला गेला, त्यात महाराष्ट्रात महत्त्वाची भूमिका शरद पवार यांची होती. भाजपला तब्बल 23 जागांवऊन 9 जागांवर खाली मविआने खेचले. 2019 ला महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी शरद पवारांनीच पुढाकार घेतला होता, काँग्रेसकडून ताठर भूमिका घेतल्यानंतर शरद पवारांनीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांच्या मध्यस्थीने अखेर हे सरकार स्थापन केले. शरद पवार जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत तोवर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात ते यशस्वी होतील अशीच धारणा शहा यांची असावी. त्यामुळेच त्यांनी आम्ही शरद पवारांना कोणतीही संधी देणार नसल्याचे विधान केले असावे. देशातील भाजपचे नेतृत्व मोदी-शहा यांच्याकडे गेल्यानंतर पवारांनी सुरूवातीला भाजपशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर काही दिवसातच बारामतीतील गोविंद बागेत गेले, मात्र त्यांनी आजपर्यंत एकदाही मातोश्रीवर भेट दिलेली नाही. मोदी पवार आपले गुरू असल्याचे सांगतात, त्यांचे बोट धऊन मी राजकारणात आलो असेही बोलले होते. त्यामुळे मोदींनी आजही पवारांवर टीका केली की विरोधक मोदींच्या या वक्तव्याचा दाखला देतात, पवारांनी सुरूवातीला भाजपशी विशेषत: नरेंद्र मोदी यांच्याशी जमवून घेण्याचा प्रयत्न केला. पण राज्यातील नेते आणि अमित शहा यांच्या दबावाला ते नमले नाहीत. त्यातच राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीसांनी पवार विरोधी स्थानिक नेत्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. जयकुमार गोरे, गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत, राहुल कुल, रणजितसिंह नाईक -निंबाळकर यातील पडळकर कधी बोलतात शरद पवार महाराष्ट्राचा कोरोना आहे तर सदाभाऊ खोत पवारांच्या चेहऱ्यावऊन त्यांच्या आजारावऊन बोलतात, मात्र पवार यांनी कधीही याकडे लक्ष दिले नाही. पवार हे कृतीतून बोलतात लोकसभेला त्यांनी विरोधकांना चोख प्रत्युत्तर दिले, पवारांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँगेसमध्ये फूट पाडण्यात आली.

Advertisement

पवारांचे चिन्ह आणि पक्षाचे नाव देखील अजित पवारांना दिले, पण पवारांनी याही परिस्थितीत लोकसभेला आपला करिष्मा पवारांनी दाखवला. भाजपच्या शिर्ष नेतृत्वाला जमले नाही ते राज्यातील नेत्यांना काय जमणार असा संदेश यातून गेल्यामुळेच कदाचित, पवारांना विरोध करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत आता शहा संकेत देऊ लागलेत. महाराष्ट्रात आले की शहा पवारांना जाब विचारतात, शरद पवारांनी काय केले. शरद पवार मात्र मी काही केले असेल की नाही माहीत नाही, पण कोणत्या तरी आरोपाखाली तुरूंगात गेलो नाही, या एकाच वाक्याने ते शहा यांच्या आरोपाची हवा काढतात. आज अजित पवारांसोबत गेलेले अनेक आमदार शरद पवारांकडे परत आले.

स्वत: अजित पवार या निवडणुकीत डेंजर झोनमध्ये असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला डॅमेज केले. काही अंशी भाजपचा सुप्त हेतू साध्य झाला, मात्र ठाकरेंच्या तुलनेत लोकसभेला शिंदे कमी पडल्याचे दिसले आणि इतके कऊनही भाजपच्या नेतृत्वाला राज्यात निरंकुश सत्ता मिळविणे जमत नसल्यानेच मोदी आणि शहा यांचा रोख हा ठाकरे आणि पवार यांच्यावरच राहीला आहे. लोकसभेला अपयश मिळाल्यानंतर आता राज्यात आणि देशाचे आर्थिक केंद्र असणाऱ्या मुंबईत भाजपला आपली स्वत:ची सत्ता ठेवायची आहे, मात्र लोकसभेला मुंबईतील तीनपैकी भाजपच्या दोन उमेदवारांचा पराभव झाला.

आता विधानसभेला किमान मुंबईत जास्तीत जास्त जागा जिंकून मुंबईत आपले वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. आज मुंबईतील घाटकोपर आणि बोरीवली या भाजपच्या बालेकिल्ल्यातच अमित शहा सभा घेत आहेत. 2019 ला शहा यांनी दिलेले आश्वासन न पाळल्यानेच युती तोडल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले. आता या निवडणूक प्रचारात शहा यांनी राज्यातील जनतेने देवेंद्र फडणवीस यांना विजयी करण्याचे ठरवले असल्याचे सांगत, फडणवीस हेच भाजपचे मुख्यमंत्री असल्याचे संकेत दिले आहेत.

महायुतीत आज अशी परिस्थिती आहे की शिवसेना किंवा भाजप कोणीही मोठा भाऊ होऊ शकतो. त्यातच एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी पवार किती वेळा वर्षावर गेले, त्यामुळे शिंदे यांच्याबाबत आता भाजपही सावध झाली आहे. भाजपने शिंदेंना कमी जागा देताना मुख्यमंत्री पदाबाबत त्याग केल्याची जाणीव कऊन दिली. शहा यांनी यावेळी महायुतीचा मुख्यमंत्री झाला तरी 2029 ला भाजपचा मुख्यमंत्री होणार तर तिकडे राज ठाकरे यांनीदेखील आता महायुतीचे सरकार येणार आणि त्यात मनसे सहभागी असणार पण 2029 ला मनसेचा मुख्यमंत्री होणार असे सांगितले, आता अमित शहा हे मुंबईत आल्यावर कोण कोणते गौप्यस्फोट करतात हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :

.