Solapur : तुळजापूर यात्रेच्या एसटीला 'देवीचा आशीर्वाद ; 1.10 कोटींचा महसूल
तुळजापूर यात्रेदरम्यान एसटीचा दणदणाट – लाखो भाविकांचा प्रवास
सोलापूर : कोजागरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तुळजापूरची यात्रा पारंपरिक भक्तिभाव, गर्दी आणि श्रद्धेच्या उत्साहात पार पडली. नवरात्रोत्सव संपल्यानंतर देवी जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांची लाट उसळली आणि या भक्तीच्या लाटेत 'लालपरी' म्हणजेच राज्य परिवहन महामंडळालाही अक्षरशः देवीचा आशीर्वाद लाभला.
सोलापूर विभागाने यात्रेदरम्यान एकूण २,६९० फेऱ्या केल्या असून या फेऱ्यांतून तब्बल १ कोटी १० लाख ८ हजार ७९२ रुपयांचा महसूल मिळवला आहे. देवीच्या भक्तांनी तुळजापूरकडे धाब घेतल्याने एसटी बसस्थानकांवर दिवसभर रांगा लागल्या होत्या.
कोजागरी पौर्णिमेला देवीच्या दर्शनासाठी शहरासह परिसरातील गावांमधून हजारो भाविक पायी निघाले, तर अनेकांनी एसटी बसने प्रवास केला. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सोलापूर विभागाने तातडीने जादा बसचे नियोजन केले. या यात्रेदरम्यान ११३ बस सतत धाबत राहिल्या आणि त्यांनी २०६७९२ किलोमीटर अंतर कापले.
. या कालावधीत एकूण १,४७,९९२ भाविकांनी एसटीतून सुरक्षित प्रवास भाविकांच्या सोयीसाठी सोलापूरसह पुणे, सातारा, सांगली आणि अन्य विभागीय कार्यालयांतूनही बस सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यात्रेच्या काळात कोणताही प्रवासी उभा राहणार नाही किंवा टपावर प्रवास करणार नाही, याची दक्षता घेण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे आणि भाविकांच्या प्रतिसादामुळे सोलापूर विभागाच्या तिजोरीत अल्पावधीत मोठा महसूल जमा झाला, असे सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सांगितले.
अधिकारी स्वतः तुळजापूर मुक्कामी
यात्रेदरम्यान एसटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी स्वतः तुळजापूर मुक्कामी उपस्थित होते. प्रवाशांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये म्हणून चालक, वाहक आणि सर्व कर्मचारी वर्गाने दिवसरात्र मेहनत घेतली.