Breaking : तुळजाभवानीचे प्राचीन मौल्यवान दागिने गायब...?
भाविकांच्या श्रद्धेवर घाला, हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब, तपासणी अहवालात धक्कादायक माहिती उघड
धाराशिव : वार्ताहर
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेला घालण्यात येनाऱ्या प्राचीन सोन्याचा मुकूटासह हिरे, मोती, माणिक, पाचू असे अनेक विविध अलंकार मंदिराच्या तिजोरीतून गायब झाले आहेत. दागिने तपासणी समितीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदी आणि प्राचीन अलंकाराची तपासणी करण्यासाठी १६ सदस्यांची समिती स्थापन केली होती. उमरगा येथील उपविभागीय अधिकारी गणेश पवार यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने मंदिर प्रशासनातील अधिकारी, पुजारी मंडळाचे प्रतिनिधी आणि महंतांचा सहभाग होता. या समितीने जिल्ह्याधिकारी यांना सोने गहाळ झाल्याचा अहवाल सादर केला आहे. या अहवालातून तुळजाभवानी मंदिरातून वेगवेगळ्या सात डब्यांमधील शेकडो वर्षांचा इतिहास असलेले अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान दागदागिने गायब असल्याचे समोर आले आहे. तुळजाभवानी देवीचे मौल्यवान दुर्मिळ दागिने एकूण सात डब्यांत ठेवण्यात आलेले आहेत. या दागिन्यांचे वय ३०० वर्षांपासून ते ९०० वर्षांपर्यंत जुने आहे. डबा क्र. १ हा विशेषप्रसंगी वापरला जातो. शारदीय व शाकंभरी नवरात्रौत्सव, संक्रांत, रथसप्तमी, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, शिवजयंती अशा महत्त्वाच्या दिवशी या डब्यातील दागदागिन्यांचा साज तुळजाभवानी देवीला केला जातो. या डब्यात एकूण २७ प्राचीन अलंकार आहेत. त्यांपैकी चार अलंकार गायब असल्याचे समितीच्या अहवालात म्हटले आहे. शिवाय अनेक अलंकाराच्या वजनात कमालीची तफावत नोंदविण्यात आली आहे. डबा क्र. ६ मधील अलंकार नित्योपचारासाठी वापरले जातात. १९७६ पर्यंत डबा क्र ३ मधील अलंकार नित्योपचार पूजेसाठी वापरले जात होते. मात्र दागिन्यांची सतत दुरुस्ती करावी लागत असल्याने डबा क्र. ३ बंद करून डबा क्र. ६ हा १९७६ पासून नित्योपचारासाठी वापरला जात आहे. त्यातील साखळीसह १२ पदरांच्या ११ पुतळय़ा असलेले मंगळसूत्र व चांदीचा खडाव हे अलंकार गहाळ झाले आहेत.डबा क्र. ७ मधील एकूण ३२ दुर्मिळ अलंकारांपैकी तुळजाभवानी देवीचा चांदीचा पुरातन मुकुट गायब असल्याचे आढळून आले आहे. तर अन्य ३१ अलंकारांच्या वजनातही लक्षवेधी तफावत असल्याचे समितीने अहवालात नमूद केले आहे.
तुळजाभवानीचा सोन्याचा मुकुट, नेत्रजोड, मंगळसूत्र असे अनेक मौल्यवान दागिने गहाळ झालेले आहेत. या प्रकरणी सीआयडी तपास करावा. जिल्ह्याधिकारी यांनी कोणाच्याही दबावास बळी न पडता दोषीवर तात्काळ कारवाई करावी.
श्री.अमरराजे कदम, अध्यक्ष तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळ
दागिने तपासणी समितीचा अहवाल आला आहे. यात अनेक संशयास्पद बाबी निदर्शनास आल्या आहे. यात कोण दोषी आहे हे ठरवण्यासाठी उपसमिती स्थापन केली आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर रीतसर कारवाई केली जाईल.
श्री.सचिन ओम्बासे, जिल्हाधिकारी, धाराशिव