तुळजाभवानी देवीच्या अलंकार गहाळ प्रकरण! 4 महंतांसह 7 जणांवर गुन्हा दाखल
1962 पासूनचे प्रकरण, विशेष पथक तपास करणार
जिल्हा प्रतिनिधी
धाराशिव : कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील अलंकार, दागिने गहाळ प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात देवीच्या चार महंतांसह 7 जणांचा समावेश आहे. दरम्यान हे प्रकरण सुमारे 1962 पासूनचे असल्याने यात काही मयत झालेल्या व्यक्तींचाही समावेश आहे. आता या प्रकरणाची चौकशी विशेष तपास पथक करणार असल्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दागिने गहाळ झाले आहेत तर वेगवेगळ्या काळात ऐतिहासिक भांडी तसेच मौल्यवान वस्तूंची चोरी झाली आहे. अलंकार गहाळ प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेत करण्यात आल्यानंतर जिल्हा प्रशासनाला तपास करून कारवाईचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी पोलिसांना तपास करून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. अलंकार गहाळ प्रकरणात देवीच्या चार महंतना दोषी ठरविण्यात आले असून, प्रकरणाची अधिक चौकशी करून दोषारोप पत्र तयार करण्यात येणार आहे.