Navratri 2025: तुळजा भवानीच्या नवरात्र महोत्सवास 14 सप्टेंबरपासून प्रारंभ, देवीची मंचकी निद्रेस सुरुवात
14 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री देवीजींची नऊ दिवसांच्या मंचकी निद्रेस सुरुवात होईल
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास 14 सप्टेंबरपासून प्रारंभ होणार आहे. 14 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबरपर्यंत मंदिर संस्थांनच्या वतीने विविध कार्यक्रमाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी श्री देवीजींची नऊ दिवसांच्या मंचकी निद्रेस सुरुवात होईल.
22 सप्टेंबर रोजी पहाटे श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना होऊन दुपारी बारा वाजता मंदिरात घटस्थापनेने नवरात्राच्या पहिल्या माळेस सुरुवात होईल, म्हणजे नवरात्र उत्सवास प्रारंभ होईल. घटस्थापनेनंतर ब्राह्मणांस अनुष्ठांची वर्णी दिली जाईल व रात्री देवीचा छबिना निघेल. 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा व रात्री छबिना होणार आहे.
शनिवार, 27 सप्टेंबर रोजी ललित पंचमी असल्याने श्रीदेवींची नित्योपचार पूजा झाल्यानंतर देवीला रथ अलंकार महापूजा मांडण्यात येते व रात्री मंदिरात छबिना काढला जातो. 27 सप्टेंबर रोजी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर देवीला मुरली अलंकार महापूजा मांडण्यात येतेव रात्री देवीचा छबिना काढण्यात येतो.
28 सप्टेंबर रोजी श्रीदेवीजींची नित्योपचार पूजा झाल्यानंतर शेषशाही अलंकार महापूजा मांडण्यात येते व रात्रीचा छबिना काढण्यात येतो. 29 सप्टेंबर रोजी देवीच्या नित्योपचार पूजेनंतर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येते व रात्रीचा छबिना काढण्यात येतो. 30 सप्टेंबर रोजी दुर्गाष्टमी असल्याने देवीच्या नित्योपचार पूजेनंतर महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात येते.
दुपारी एक वाजता वैदिक होम हवनास आरंभ होईल. सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी होमामध्ये पूर्णाहुती दिली जाते व रात्री छबिना काढला जातो. 1 ऑक्टोबर रोजी महानवमी असल्याने श्रीदेवीच्या नित्योपचार पूजेनंतर दुपारी बारा वाजता होमावर धार्मिक विधी घटोत्थापन व रात्री नगरवरून येणाऱ्या पलंग पालखीची मिरवणूक काढण्यात येते.
2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे. सार्वत्रिक सीमोल्लंघन उष:काली श्री देवीजींचे शिबीकारोहन, सीमोल्लंघन, मंदिराभोवती देवींची मिरवणूक होऊन देवीच्या पाच दिवसांच्या मंचकी निद्रेस सुरुवात होते व शमी पूजन होईल. 6 ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा आहे. 7 ऑक्टोबर रोजी मंदिरची पौर्णिमा असेल. पाच दिवसांच्या निद्रेनंतर पहाटे श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल.
त्यानंतर देवीची नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना आणि मंदिरात देवीच्या महंतांचा जोगवा असतो. 8 ऑक्टोबर रोजी देवीजींच्या नित्योपचार पूजेनंतर मंदिर संस्थांनच्या वतीने भव्य अन्नदान केले जाते व रात्री सोलापूरच्या काठ्यांसह छबिना काढण्यात येतो. सध्या मंदिर संस्थांमार्फत भाविकांसाठी अनेक विकासात्मक कामे सुरू आहेत. यासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन मंदिर संस्थानने भाविकांना काले आहे.