For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तुकारामांचा ‘श्रीराम’

06:36 AM Apr 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
तुकारामांचा ‘श्रीराम’
Advertisement

संत तुकाराम महाराज यांचे अनेक अभंग भगवान राम आणि रामनाम यांचे गुणगान करणारे आहेत. रामायणातील सीतेच्या विरहावस्थेचे वर्णन करता करता स्वत:ही तुकाराम महाराज भगवान रामाचा विरह अनुभवीत आहेत आणि सांगत आहेत अशा अवस्थेत केवळ हरिनामच एक आश्र्रय आहे. ते म्हणतात,  वासुगीच्या वनी सीता शोक करी। कांहो अंतरले रघुनाथ दुरी ।येऊनी गुंफेमाजी दुष्टे केली चोरी । कांहो मज आणिले अवघड लंकापुरी।।1।।सांग वो त्रिजटे सखिये ऐसी मात । देईल कां नेदी भेटी रघुनाथ । मन उताविळ जाला  दुरी पंथ । राहो न सके प्राण माझा कुडी आंत ।।2।। काय दुष्ट आचरण होते म्यां केले । तीर्थ व्रत होते कवणाचे भंगिले । गाईवत्सा पत्नीपुऊषा विघडिले। न कळों वो संचित चरण अंतरिले ।।3।। नाडियेले आशा मृगकांतिसोने । धाडिले रघुनाथ पाठिलागे तेणे । उल्लंघिली आज्ञा माव काय मीं जाणे । देखोनी सुनाट घेऊनि आले सुनें ।।4।। नाही मूळ मारग लागे आणिक सोय । एकाविण नामे रघुनाथाच्या माय। उपटी पक्षिया एक देऊनी पाय । उदकवेढ्यामध्ये तेथें चाले काय ।।5।। जनकाची नंदिनी दु:खे ग्लानी थोरी । चुकली कुरंगिणी मेळा तैशा परी । संबोखी त्रिजटा स्थिर स्थिर वो करी । येईल तुकयास्वामी राम लंकापुरी ।।6।।

Advertisement

अर्थात “सीता ही लंकेमध्ये अशोकवनात शोक करीत आहे, ती त्रिजटेजवळ म्हणते-” सखे त्रिजटे, माझे स्वामी रघुनाथ हे मला का अंतरले? दुष्ट रावणाने पर्णकुटीत येऊन मला पळविले आणि असल्या या अवघड लंकापुरीत मला का हो आणले? हे त्रिजटे सखे, मला नक्की सांग की माझे रघुनाथ मला भेटतील की नाही? माझे मन फार उतावळे झाले आहे, पण ते तर येथून फार दूर आहेत आणि माझ्या या कुडीत प्राण राहीनासा झाला आहे. मी पूर्वजन्मी कांही क्रूर कर्म केले होते काय? कोणाचे व्रत भंग केले काय? गायीची आणि वासराची ताटातूट केली काय? पत्नीची आणि पतीची ताटातूट केली काय? माझे संचित कसे आहे ते कळत नाही. पण रघुनाथांच्या चरणापासून मी अंतरले आहे एवढे खरे. त्या सुवर्णमृगाच्या आशेनेच मला फसविले आणि मीच रघुनाथांना त्याच्यामागे धाडले आणि लक्ष्मणाची आज्ञा मी मोडली. झोपडी रिकामी पाहून त्या रावणरूपी कुत्र्याने मला येथे बळजबरीने आणले. आता या संकटातून सुटण्यासाठी रघुनाथाच्या नामाशिवाय दुसरा मार्ग दिसत नाही. त्या दुष्ट रावणाने त्या जटायू पक्षाच्या अंगावर पाय देऊन त्याचे पंख उपटले आणि त्यास मारले. सभोवती पाण्याने वेढलेल्या स्थितीत बिचाऱ्या जटायूचे कांहीच चालले नाही. अशा प्रकारे जनकराजाची कन्या दु:खाने व्याकुळ झाली. हरीणीच्या कळपातून हरिणी वेगळी झाल्यासारखी तिची अवस्था झाली. समोरची त्रिजटा तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली, “तुकाराम महाराज म्हणतात की राम लवकरच लंकेस येऊन तिची सुटका करतील असे तिने सांगितले.”

त्यानंतर एका अभंगात रावणाला सावधानतेचा उपदेश करताना म्हणतात पैल आला राम रावणासी सांगती । काय निदसुरा निजलासी भूपति।।1।। अवघें लंकेमाजी झाले रामाचे दूत। व्यापिलें सर्वत्र बाहेरी भीतरी आंत।।ध्रु.।। अवघे अंगलग तुझे वधियेले वीर। होई शरणागत किंवा युद्धासी सादर।।2।। तुका म्हणे ऐक्मया भावें रामेसी भेटी । करूनि घेई आतां संबंधेशी तुटी ।।3।। अर्थात “हे भूपती रावणा,  पलीकडे राम वानरसेना घेऊन लंकेवर आक्रमण करण्यासाठी आला आहे असे दूत सांगत आहेत व त्याला म्हणत आहेत तू अजूनही का असावधपणे झोपलेला आहेस? अरे त्या रामाचे दूत म्हणजे वानर सर्व लंकेत घुसले आहेत. प्रत्येकाच्या घरात बाहेर ते व्यापून उरले आहेत. अरे तुझे अतिशय प्रिय आणि शूरवीर असे योध्दे श्रीरामांनी मारले आहेत. त्यामुळे तू प्रभू श्रीरामचंद्रांना शरण तरी जा किंवा युध्दासाठी तयार तरी हो. तुकाराम महाराज म्हणतात, पुढे ते सेवक रावणाला म्हणतात की आता तू एकनिष्ठेने प्रभू रामचंद्रांना शरण जा आणि सर्व संसारीक संबंध तोडून टाक ”

Advertisement

त्यानंतर श्रीरामाने रावणाला ठार केले आणि बिभीषणाला श्रीलंकेचा राजा बनविले आणि सीतेची सुटका केली याबद्दल म्हणतात केला रावणाचा वध। अवघा तोडिला संबंध ।।1।। लंकाराज्यें बिभीषणा । केली चिरकाळ स्थापना ।।ध्रु.।। औदार्याची सीमा । काय वर्णु रघुरामा ।।2।। तुका म्हणे माझा दाता । रामें सोडविली सीता ।।3।।

अर्थात “प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध कऊन त्याला भवबंधनातून मुक्त केले. रावणाचा भाऊ बिभीषण याला चिरंजीव केले आणि श्रीलंकेचा राजा बनविले. हे रघुरामा, तुझ्या अमर्याद औदार्याचे मी किती वर्णन करू? तुकाराम महाराज म्हणतात, ज्या श्रीरामाने सीतेला सोडविले तो माझा रक्षणकर्ता आहे.”

त्यानंतर श्रीराम अयोध्येस परत आले त्याचे वर्णन करताना म्हणतात आनंद झाला अयोध्येसी आले रघुनाथ। अवघा जयजयकार आळंगिला भरत।।1।।आनंदले लोक नरनारी परिवार। शंखभेरीतुरें वाद्यांचे गजर ।।ध्रु.।। करिती अक्षवाणें ओंवाळिती रघुवीरा। लक्ष्मीसहित लक्ष्मण दुसरा।।2।। झालें रामराज्य आनंदलीं सकळें । तुका म्हणे गाईवत्सें नरनारी बाळें ।।3।। अर्थात “ज्यावेळी प्रभू रामचंद्र, सीता व लक्ष्मण अयोध्येत आले त्यावेळी सर्व अयोध्यावासीयांना खूप आनंद झाला. सर्वांनी प्रभू रामचंद्रांच्या नामाचा जयजयकार केला व प्रभू रामचंद्र पुष्पक विमानातून उतरल्यावर पहिल्यांदा भरताला भेटून आलिंगन देतात. प्रभू रामचंद्र अयोध्येत आले त्यामुळे सर्व लोकांना, स्त्री-पुऊषांना परिवारांना खूप आनंद झाला. त्यांचे स्वागत करण्यासाठी शंख, भेरी, तुताऱ्या व इतर वाद्यांचे गजर लोक कऊ लागले. प्रभू रामचंद्र सीता व लक्ष्मण यांचे आगमन ज्यावेळी झाले त्यावेळी सर्व स्त्रीयांनी त्यांना अक्षय वाण कऊन ओवाळले. तुकाराम महाराज म्हणतात, “त्यानंतर प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला व रामराज्य चालू झाले व पृथ्वीवरील सर्व जीव त्यामध्ये गाई, वासरे, स्त्री, पुऊष, लहान, वृध्द सर्वांनाच आनंद

झाला.”

त्यानंतर श्रीरामनामाचा गौरव करताना म्हणतात मी अल्पमतिहीन । काय वर्णु तुझे गुण। उदकीं तारिले पाषाण । हें महिमान नामाचें।।1।। नाम चांगलें चांगलें । माझे कंठीं राहो भलें। कपिकुळ उद्धरिलें। मुक्त केलें राक्षसां ।।ध्रु.।। द्रोणागिरी कपिहातीं। आणविला सीतापती । थोर केली ख्याति। भरतभेटीसमयीं ।।2।।शिळा होती मनुष्य झाली। थोर कीर्ती वाखाणिली । लंका दहन केली। हनुमंते काशानें ।।3।। राम जानकीजीवन। योगियांचे निजध्यान। राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो।।4।।

अर्थात “ हे प्रभू रामचंद्रा मी अल्पबुध्दी आणि मतिहीन आहे तुझे गुण मी कसे वर्णन कऊ? तुमच्या नामाचा महिमा एवढा मोठा आहे की ते नाम दगडावर लिहिले आणि दगड पाण्यात तारले गेले. श्रीरामा, तुझे नाम चांगले आहे, खूप चांगले आहे आणि तेच माझ्या कंठामध्ये राहू द्यावे. संपूर्ण वानरकुळाचा उद्धार या नामानेच केला व सर्व राक्षसांचाही उद्धार या नामानेच केला. हनुमंतांनी श्रीरामनामाच्या सामर्थ्यावर द्रोणागिरी पर्वत आणला आणि भरत भेट घडवून आणली. हनुमंतांनी लंकादहन केले तेही सामर्थ्य श्रीरामनामाचेच. तुकाराम महाराज म्हणतात, जो जानकी-जीवन राम आहे, योगिजन ज्याचे नित्य चिंतन करतात, जो राजीवलोचन आहे अश्या त्या प्रभू श्रीरामांच्या चरणावर मी मस्तक ठेवले आहे.

श्रीरामनामाचा गौरव करणारे एक हिंदी भजनही प्रसिद्ध आहे  रामभजन सब सार मिठाई । हरी संताप जनमदुख राई ।।ध्रु.।। दुधभात घृत साकरपारे। हरते भुक नहि अंततारे ।।1।। खावते जुग सब चलिजावे । खटमिठा फिर पचतावे ।।2।। कहे तुका रामरस जो पावे । बहुरि फेरा वो कबहु न खावे ।।3।।

अर्थात “श्रीरामाचे भजन करणे हे मधुरतम आहे, त्याने जन्म दु:ख आणि त्रिविध ताप पूर्ण नाहीसे होतात. दूध-भात, तूप, साखर हे तुमची भूक शांत करतील पण अंतकाळी तुम्हाला भवसागरातून तारणार नाही. मोहाने खाता-खाता आयुष्य निघून जाते आणि आंबट-गोड खाण्याचा पश्चाताप होतो. तुकाराम महाराज म्हणतात, राम रसाचे जो सेवन करतो त्याला जन्म-मरणाचे फेरे पुन्हा घ्यावे लागत नाहीत.”

- वृंदावनदास

Advertisement
Tags :

.