पाकिस्तानच्या सैन्यावर ‘टीटीपी’चा हल्ला
लष्करी छावणीवरील हल्ल्यात सात सैनिक ठार : चकमकीत चार दहशतवाद्यांचाही मृत्यू
वृत्तसंस्था/ वझिरिस्तान
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या छावणीवर ‘टीटीपी’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यात सात सैनिक ठार झाले आहेत. तसेच या हल्ल्यानंतर झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचाही मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या संघर्षादरम्यान दोन्ही बाजूंना मोठे नुकसान झाले. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर हल्ल्यांचा आरोप केला आहे.
पाकिस्तानमधील अफगाण सीमेजवळील उत्तर वझिरिस्तानच्या मीर अली भागात शुक्रवारी आत्मघाती हल्ला झाला. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्षामागील दहशतवादी गट ‘तेहरिक-ए-तालिबान’ने पुन्हा एकदा देशातील पाकिस्तानी सैनिकांना लक्ष्य केले आहे. टीटीपीने केलेला हा हल्ला सीमावर्ती प्रांत खैबर पख्तूनख्वा येथे झाला. अफगाण सीमेजवळ झालेल्या आत्मघाती हल्ल्यात सात सैनिक ठार झाल्याचे पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच अन्य 13 जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या महिन्यात दोन्ही देशांमधील अनेक दिवसांच्या भीषण संघर्षानंतर युद्धबंदीची परिस्थिती लागू असताना पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात ही भीषण चकमक झडली आहे.
पाकिस्तानी सुरक्षा दलाने हा आत्मघाती हल्ला हाणून पाडण्यात आला. या चकमकीदरम्यान आत्मघातकी बॉम्बरसह चार दहशतवादी ठार झाल्याचा दावा पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, उत्तर वझिरिस्तान जिह्यातील मीर अली भागात दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या छावणीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यानंतर संघर्ष वाढत गेला. एका आत्मघाती बॉम्बरने स्फोटकांनी भरलेले वाहन लष्करी छावणीच्या सीमा भिंतीवर आदळवल्यामुळे मोठा स्फोट होऊन छावणीची भिंत कोसळली. याचा फायदा घेत आणखी तीन हल्लेखोरांनी लष्करी छावणीत घुसण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा दलांनी दिलेल्या वृत्तानुसार, छावणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करणारे इतर तीन दहशतवादी आत जाण्यापूर्वीच मारले गेले.
टीटीपीविरुद्ध पाकिस्तानी लष्कराचे ऑपरेशन
गेल्या दोन दिवसांत संपूर्ण प्रदेशात केलेल्या कारवाईत अफगाण तालिबान समर्थित 88 दहशतवादी मारले गेल्याचेही सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले. चालू आठवड्यात खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कारवायांमध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचे 34 जण मृत झाले आहेत. या कारवाया उत्तर वझिरिस्तान, दक्षिण वझिरिस्तान आणि बन्नू जिह्यात झाल्या. टीटीपी ही पाकिस्तानमध्ये दहशतवादी संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे. या संघटनेला अफगाणिस्तानकडून पाठिंबा मिळतो, असा पाकिस्तानचा दावा आहे. तथापि, तालिबान सरकारने याचा इन्कार केला आहे. पाकिस्तानने अलिकडेच काबूल आणि अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागात टीटीपीच्या तळांना लक्ष्य करून हवाई हल्ले केल्याने दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर दोन्ही बाजू सध्या 48 तासांच्या युद्धबंदीखाली आहेत.