रशियात भूकंपानंतर सुनामीचा इशारा
तीन तीव्र धक्क्यांनी देश हादरला : लोकांमध्ये घबराट
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाच्या पूर्व भागात रविवारी भूकंपाचे सलग तीन धक्के जाणवल्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली. या भूकंपाची तीव्रता 6.6 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. 6 रिश्टर स्केलपेक्षा तीव्र क्षमतेच्या हादऱ्यांमुळे सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. मात्र, जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे आणि स्थानिक प्रशासनाला सतर्क ठेवण्यात आले आहे. जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सने ही माहिती दिली आहे.
रशियाच्या कामचटका प्रदेशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 10 किलोमीटर खाली होता. पहिल्या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी नोंदवली गेली होती. त्यानंतर आणखीही दोन धक्के जाणवले. सर्वाधिक तीव्रतेचा भूकंप 6.6 रिश्टर स्केलचा होता. भूकंपाच्या धक्क्यांमुळे समुद्रात सुनामीचा धोका आहे. भूकंपानंतरची परिस्थिती पाहता यूएस सुनामी केंद्राने हवाई आणि रशिया या दोन्ही देशांसाठी सुनामी अलर्ट जारी केला आहे.