शक्तिशाली भूकंपानंतर रशियामध्ये सुनामी
8.8 रिश्टर स्केल तीव्रता : 30 वेळा जाणवले हादरे : जपान-अमेरिकेलाही झळ
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशियाच्या पूर्वेस असलेल्या द्वीपकल्प कामचटकामध्ये शक्तिशाली भूकंप झाल्यानंतर सुनामीचा इशारा जारी करण्यात आला होता. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण प्रणालीनुसार, भूकंपाची तीव्रता 8.8 रिश्टर स्केल इतकी होती. हा आतापर्यंतचा जगातील सहावा सर्वात मोठा भूकंप होता. या भूकंपाचे केंद्र जमिनीपासून 19.3 किलोमीटर खोलीवर होते. बुधवारी सकाळी भारतीय वेळेनुसार 4:54 वाजता कामचटका द्वीपकल्पासह आजबाजुचा परिसर भूकंपाने हादरला. त्यानंतर कामचटकाला 5 मीटर उंचीपर्यंत लाटा निर्माण झाल्यामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.
रशियाच्या पूर्व किनाऱ्यावरील कामचटका द्वीपकल्पाजवळ भूकंपाने प्रचंड विनाश घडवला आहे. रिश्टर स्केलवर 8.8 तीव्रतेच्या भूकंपामुळे जमीन हादरल्यानंतर लोकही घाबरले. भूकंपानंतर कामचटका येथे 30 हून अधिक छोटे-मोठे धक्के जाणवले. क्षणार्धात विनाशाचे दृश्य दिसण्याची शक्यता ओळखून लोक घराबाहेर पळू लागले. त्याचवेळी, भूकंपानंतर रशियाच्या कुरिल बेटांच्या किनारी भागात आणि जपानच्या मोठ्या उत्तरेकडील बेट होक्काइडोला सुनामी आली. अनेक भागात सुनामीचा इशारा देण्यात आल्यामुळे लोकांची धावपळ उडाली. भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पळाले. भूकंपादरम्यान विमानतळासह अनेक ठिकाणी झालेल्या पडझडीमुळे लोकांना किरकोळ दुखापत झाली. मात्र, कोणत्याही ठिकाणी मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त जारी करण्यात आले नव्हते.
कामचटकाचे राज्यपाल व्लादिमीर सोलोडोव्ह यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत आजचा भूकंप दशकांमधील सर्वात शक्तिशाली असल्याचे स्पष्ट केले. या आपत्तीमध्ये एका बालवाडी शाळेचे नुकसान झाले आहे. देशाच्या पूर्व किनाऱ्याजवळ सुनामी लाटा निर्माण झाल्या. या हादऱ्यांमुळे जपानने राजधानी टोकियोमधील 20 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले होते. याशिवाय, फुकुशिमा येथील अणुभट्टी रिकामी करण्यात आली आहे. अमेरिकेतील अलास्का आणि हवाई बेटांवर त्सुनामीच्या लाटा पोहोचल्या आहेत.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
रशियाच्या कामचटका येथे झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यात एका घरातील वस्तू हादरत असल्याचे दिसून आले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एका छावणीत ठेवलेल्या वस्तू हलताना दिसत आहेत. अनेकांनी यासंबंधी आपबीतीही कथन केली आहे. कोणीतरी आपल्याला वेगाने ढकलत असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.
घरांमधील शेल्फ कोसळले
भूकंपानंतर रशियाच्या सर्वात मोठ्या शहरात पेट्रोपाव्लोव्स्क-कामचत्स्की येथे बचावासाठी लोक रस्त्यावर आले. मोठ्या हादऱ्यांमुळे घरांमधील शेल्फ तुटून पडले. तसेच खिडक्यांच्या काचा फुटल्या. रस्त्यावर गाड्यांचेही नुकसान झाले. तसेच इमारती हादरताना दिसल्या.
सुनामी इशारा सायरन वाजले
रशियातील कामचटका येथे झालेल्या भूकंपानंतर रशियाच्या कुरिल बेटांच्या किनारी भागात आणि जपानच्या मोठ्या उत्तरेकडील बेट होक्काइडोला सुनामी आली. मंगळवारी होनोलुलुमध्ये सुनामी इशारा सायरन वाजले. त्यानंतर लोकांना उंच ठिकाणी जाण्यास सांगण्यात आले. पहिली सुनामी लाट पॅसिफिक महासागरातील रशियाच्या कुरिल बेटांची मुख्य वस्ती असलेल्या सेवेरो-कुरिलस्कच्या किनारी भागात धडकली. येथे जवळपास राहणारे लोक सुरक्षित असून सुनामीचा धोका टळेपर्यंत ते उंच ठिकाणी थांबणार आहेत.