लवकरात लवकर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करा
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे म. ए. समितीच्या शिष्टमंडळाची मागणी
वार्ताहर/सांबरा
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न सध्या न्यायप्रविष्ठ आहे. त्यासाठी आपण लवकरात लवकर सीमाप्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करावा व येथील मराठी जनतेला न्याय द्यावा, अशी मागणी खासदार आणि सहकार व नागरी उड्डाण खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने केली. पुण्याहून खाजगी विमानाने सांबरा विमानतळावर येऊन चंदगडकडे जाताना मुरलीधर मोहोळ यांची म. ए. समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी माजी महापौर सरिता पाटील व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी त्यांचे सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधले व सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आपलेही सहकार्य मोलाचे असून येथील मराठी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी त्यांच्याकडे मागणी करण्यात आली. यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, आम्ही सर्वजण एकच असून मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, अशी त्यांनी ग्वाही दिली.
यावेळी त्यांचे म. ए. समिती, लोकमान्य सोसायटी व सांबरा ग्रामस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक पंढरी परब, लोकमान्य सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी, सुबोध गावडे, राजू नाईक, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, माय मराठी संघाचे अध्यक्ष दिलीप चव्हाण, विश्वनाथ पाटील, अनंत चौगुले, राजू पोटे, गजानन पवार, माऊती जत्राटी, गंगान्ना तिमापुरमठ, चंदगडचे आशिष साखरे, किशोर बेल्लद, सुनील कांजरे आदी उपस्थित होते.
विमान फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करणार
सध्या सांबरा विमानतळावरून विमान फेऱ्या कमी करण्यात आल्या असून बेळगाव-बेंगळूर विमानफेरी ही रद्द करण्यात येणार आहे. यासाठी माजी महापौर सरिता पाटील व माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी येथील विमानसेवा सुरळीत करून बेळगाव-पुणे ही विमानफेरीही सुरू करण्याची त्यांच्याकडे मागणी केली. येथून विमान फेऱ्या पूर्ववत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांनी दिली.