कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सत्य, अहिंसा आणि गांधी अस्त्र!

06:51 AM Aug 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोल्हापूर जिह्यातील नांदणी मठात श्रद्धेचा अविभाज्य भाग ठरलेली हत्तीणी माधुरी उर्फ महादेवी ही कल्याणच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अंबानी कुटुंबाच्या ‘वनतारा‘ प्रकल्पात हलविण्यात आली. मात्र या निर्णयानंतर स्थानिक समाज आणि भाविकांमध्ये उद्रेक झाला. बहिष्कार, निदर्शने, आणि एका अश्रूबिंदूंनी ओथंबलेल्या हत्तीच्या डोळ्यांतून सुरु झालेली लढाई  शांततामय बहिष्काराच्या अर्थात गांधी अस्त्राच्या प्रभावाचे समकालीन उदाहरण ठरली. नांदणी मठात 14 वर्षांपासून असलेली हत्तीणी माधुरी (महादेवी) ही मठाच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा भाग होती. लोक तिच्यावर जीवापाड प्रेम करत. ती कोणत्याही धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत असे, तिचा नित्य पूजेसारखा मान होता.

Advertisement

मात्र पिटा इंडिया या संस्थेने 2024 मध्ये माधुरीच्या आरोग्य व देखभाली संदर्भात तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, हत्ती शहरी वातावरणात अयोग्य रितीने ठेवण्यात येत आहे. यावरून महाराष्ट्र वन विभागाच्या शिफारशीवरून आधी मुंबई उच्च न्यायालय आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाने माधुरीला वनतारा प्रकल्पात हलविण्याचे आदेश दिला. 28 जुलै रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी मठात आले. भाविकांचा मोठा जमाव उपस्थित होता. माधुरीला ट्रकवर नेत असताना मठातील महिला, वृद्ध भाविक, स्वयंसेवक रडत होते, ‘हिला न्याय देऊ नका, माया देऊ‘ अशी आर्जवे करत होते. आश्चर्य म्हणजे, माधुरीच्या डोळ्यातही पाणी जमा झाल्याचे दृश्य अनेकांनी पाहिले. हे दृश्य सोशल मिडियावर व्हायरल झाले आणि हा एक ‘भावनिक प्रतिकार‘ जनआंदोलनात कसा रूपांतरित होतो, याचे उदाहरण बनले. वनतारा प्रकल्प, गुजरात येथील, रिलायन्स फाउंडेशनचे प्राणी पुनर्वसन केंद्र आहे. येथे देशभरातील आजारी किंवा जखमी प्राण्यांची जगातील उच्चतम तज्ञांकडून काळजी घेतली जाते असे सांगितले जात असले तरी त्यांच्यावर देखील आक्षेप घेतले गेले आहेत. सोशल मिडिया व स्थानिक आक्रोश वाढल्यानंतर वनताराच्या सीईओंनी न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून हत्ती पुन्हा परत देण्याची तयारी दर्शवली. अर्थात लोकक्षोभ वाढल्याने असे राजकीय आश्वासन देण्याची प्रथा आहे.  ‘जर कायदेशीर मार्गातून परवानगी मिळाली, तर... आम्ही स्वत: माधुरीला परत आणण्यासाठी प्रयत्न करू. ही ती चतुर भाषा! लोकांनी अंबानी परिवाराशी संबंधित जिओ मोबाईल पोर्टिंग कॅम्प्स कोल्हापूर, सांगली, बेळगाव येथे सुरू केले. याशिवाय रिलायन्स रिटेल, ट्रेंड्स, नेटमेड्स यांसारख्या अंबानी कंपन्यांवर खुला बहिष्कार जाहीर झाला. डेटाचा वापर करूनच जर सोशल मिडियावर हत्तीच्या हालचालीचे, भाविकांच्या भावना व्यक्त करणारे, मोहीम चालवणारे पोस्ट्स, रिल्स, लाईव्ह व्हिडीओ हजारोंच्या संख्येने प्रसारित झाले. मोबाईल डेटा फक्त मनोरंजनासाठी नाही, तर अन्यायाविरोधात बंड पुकारण्यासाठी किती प्रभावीपणे वापरता येतो याचे हे उदाहरण ठरले. सध्या माधुरी वनतारा प्रकल्पात आहे, मात्र नांदणी मठ समितीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. या याचिकेत असे नमूद आहे की, माधुरीचा आरोग्य अहवाल वन विभागाच्या दुसऱ्या पथकाने सकारात्मक दिला आहे. ती धार्मिक व सांस्कृतिक प्रतीक ठरली असून तिच्या अनुपस्थितीत भाविकांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. तिला अत्यंत प्रेमपूर्वक सांभाळले जात होते, त्याचे दस्तावेजी पुरावे आहेत. या लढ्यात पीटा इंडिया, अंबानी फाउंडेशन, वन विभाग, नांदणी मठ, आणि भाविक हे घटक वेगवेगळे आहेत.  पण सगळ्यात निर्णायक ठरले ते म्हणजे  जनतेचे भावनिक वर्तन आणि गांधीगिरीची ताकद. हा मुद्दा केवळ एका हत्तीच्या स्थलांतराचा नव्हता, तर तो आध्यात्म, श्रद्धा, वन्य कायदे, आणि कॉर्पोरेट ताकदीच्या विरोधातील संवेदनशील लढा ठरला. विशेषत: जेव्हा त्याला डिजिटल माध्यमांची धार लाभली. माधुरी माघारी येईल का? कायदा आणि भावना यामध्ये संतुलन साधणारा निर्णय काय असेल? ही उत्तरे येत्या काही आठवड्यांत स्पष्ट होतील. पण एक गोष्ट नक्की  कॉर्पोरेट घराण्यांनाही जनतेच्या भावना समजून घ्याव्याच लागतात, हे नांदणीच्या मातीने पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. पण, एवढ्यावरच आपण खुश होणार आहोत का? नांदणी पाठोपाठ शेडबाळच्या मठातील हत्ती देखील ताब्यात घेतला जाऊ शकतो. गांधींचे आपण जेव्हा नाव घेतो त्यावेळी सत्य सुद्धा मान्य करण्याची हिंमत आणि धाडस ठेवावे लागते. जमावाच्या भावना कितीही तीव्र असल्या तरी धर्मस्थळांवरील हत्तींचे अकाली निधन हेही वास्तव आहे. ज्योतिबाच्या डोंगरावरील सुंदर असो किंवा पालखंडोबाचा रामप्रसाद. तासगावची गौरी असो किंवा तामिळनाडू, केरळ, कर्नाटकातील अन्य कोणते हत्ती. 2004 साली सांगलीच्या बबलू हत्तीच्या निधनानंतर एक गोष्ट नक्की झाली होती, ती म्हणजे हे जंगलातील प्राणी त्यांच्या अधिवासापासून दूर असताना एक तर जोडीने आणले पाहिजेत. प्रदीर्घ अशा वनाच्छदीत शेत जमिनीवर नैसर्गिक जलस्रोत आणि वाळूच्या उपलब्धतेच्या ठिकाणी त्यांचा अधिवास निर्माण केला पाहिजे.  केरळ, कर्नाटक मध्ये हत्ती संगोपन केंद्र आहेत. तशा पद्धतीने भारतातील धार्मिक मठांना हे कार्य करणे फारसे अवघड नाही. प्रारंभी थोडा त्रास झाला तरी एक व्यवस्था उभी राहील. या हत्तींचे वारंवार प्रदर्शन चालवणे आणि गाव फेरी बंद करून ते आजारी पडण्यापूर्वीच जोडीदारांच्या मदतीने त्यांचा अधिवास निर्माण केला गेला तर या हत्तींचे जीवनमान उंचावेल. कोणी तक्रार करण्याची वेळ येणार नाही. आज काल मिरवणुकींसाठी कृत्रिम हत्ती सहज उपलब्ध होत आहेत. त्यांचा उपयोग केला गेला तर ही श्रद्धा केंद्रे हत्तींच्या संगोपणाने अधिक संपन्न होतील. समाजाने जितकी शक्ती हत्ती परत आणण्यासाठी लावली आहे तितकीच शक्ती हे हत्ती जगवण्यासाठी सुद्धा लावली पाहिजे. त्या जीवन शृंखलेत हत्तीही येतो याचा विचार श्रद्धावान माणसांनी अधिक काळजीपूर्वक केला पाहिजे. त्यासाठी सत्यालाही सामोरे गेलेच पाहिजे!

Advertisement

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article