Rupali Chakankar कागदी घोडे नाचविणाऱ्या अध्यक्षा, Trupti Desai यांची खोचक टीका
महिला आयोगाचा चेहरा बदलावा किंवा ते पद रिक्त ठेवावे
सांगली : राज्यात महिला असुरक्षित असल्याचे विविध घटनांवरुन समोर येत असल्यामुळे परिस्थिती गंभीर आहे. सध्या हुंडाबळीतील आरोपींना तातडीने जामिन मिळतो आणि ते बाहेर उजळ माथ्याने फिरतात. राजकीय पक्षाशी संबंधित असलेल्या रुपाली चाकणकर या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
महिला आयोगाकडे आलेल्या तक्रारी निकाली निघत असल्या तरी त्यातील कित्येक महिलांना न्याय मिळत नाही. चाकणकर या केवळ कागदी घोडे नाचविणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा आहेत, त्यामुळे महिला आयोगाचा चेहरा बदलावा किंवा ते पद रिक्त ठेवावे, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी पत्रकार बैठकीत केली.
देसाई म्हणाल्या, मागील सत्ताकाळापासून महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर आहेत. महिला आयोग ही स्वायत्त संस्था असल्यामुळे त्याच्या अध्यक्षपदावर राजकीय पक्षाशी संबंधित कोणत्याही व्यक्तीला राहता येत नाही. परंतु राष्ट्रवादीशी संबंधित चाकणकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार आहे. तो बेकायदेशीर आहे. करुणा मुंडे, वैष्णवी हगवणे आदी प्रकरणांचे काय झाले हे राज्यापुढे आहे.
सत्ताधारी पक्षाशी संबंधित संशयित असतील तर त्यांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरु आहे. हुंडाबळी कायदा कागदावर अस्तित्वात आहे परंतु त्यानुसार किती दोषींना शिक्षा झाली याची आकडेवारी आयोगाने जाहीर करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कार्यरत असलेले देवेंद्र फडणवीस हे कार्यक्षम अधिकारी आहेत. परंतु प्रशासकीय अधिकारी सक्षम नाहीत. त्यामुळे अन्याय झालेल्या महिलांना न्याय मिळत नाही. वैष्णवी प्रकरणानंतर विविध जिल्ह्यातून प्रकरणे माझ्याकडे येत आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून वस्तुस्थिती मांडणार आहे.