उपराष्ट्राध्यक्ष डिबेटमध्ये ट्रम्प यांच्या पक्षाला पसंती
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी बुधवारी उपराष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारांमध्ये डिबेट (वाद-विवाद) झाला. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार टिम वॉल्झ आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांच्यात 90 मिनिटे डिबेट झाली. सीबीएस न्यूजने या चर्चेचे आयोजन केले होते. वादविवादानंतर घेण्यात आलेल्या मतदानात डोनाल्ड ट्रम्प यांचे सहकारी उमेदवार जेडी व्हॅन्स यांना विजयी घोषित करण्यात आले. 42 टक्के लोकांनी ट्रम्प यांच्या पक्षाचे उमेदवार असलेल्या व्हॅन्स यांना पसंती दर्शवली. तर 41 टक्के लोकांनी टिम वॉल्झ यांना मते टाकली. 17 टक्के लोकांनी तटस्थ असल्याचे मत नोंदवले आहे.
अमेरिकेत 5 नोव्हेंबरला राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक होत आहे. दोन्ही प्रमुख पक्षांची ही शेवटची चर्चा होती. राष्ट्राध्यक्षपदासाठी आतापर्यंत दोन डिबेट झाले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन पहिल्या वादानंतर शर्यतीतून बाहेर पडले. उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी त्यांची जागा घेतल्यानंतर ट्रम्प यांच्यासोबतच्या दुसऱ्या डिबेटमध्ये भाग घेतला होता.